भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमतासह मोठा राजकीय विजय मिळवत सत्तेवर आपली पकड अधिक मजबूत केली आहे. या निवडणुकीत भाजपच्या नगरसेविका सौ. शैलजा पुरूषोत्तम नारखेडे यांनी दणदणीत विजय संपादन करत उपनगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले आहे.

ही निवडणूक प्रक्रिया आज १५ जानेवारी २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात पार पडली. पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा सौ. गायत्री भंगाळे तसेच मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या उपस्थितीत प्रस्तावांची छाननी व पुढील प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली. यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक सभागृहात उपस्थित होते.

उपनगराध्यक्षपदासाठी भाजपकडून दोन उमेदवारांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये सौ. प्रिया बोधराज चौधरी आणि सौ. शैलजा पुरूषोत्तम नारखेडे यांचा समावेश होता. भाजपकडून सूचक म्हणून नगरसेवक युवराज लोणारी तर अनुमोदक म्हणून राजेंद्र आवटे यांनी भूमिका बजावली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून सुनिता कृष्णधन कर यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला.
प्रस्ताव सादर झाल्यानंतर नियमानुसार १५ मिनिटांचा माघार घेण्याचा कालावधी देण्यात आला. या कालावधीत भाजपच्या सौ. प्रिया बोधराज चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपकडून फक्त शैलजा पुरूषोत्तम नारखेडे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे गटनेते सचिन संतोष चौधरी यांनी उपनगराध्यक्ष निवडीसाठी गुप्त मतदानाची मागणी केली. मात्र, मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी कायद्यातील तरतुदी स्पष्ट करत उपनगराध्यक्ष निवडीसाठी हात उंचावून मतदान करण्याचीच तरतूद असल्याचे सांगत ही मागणी फेटाळून लावली.
यानंतर हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनिता कृष्णधन कर यांना नगराध्यक्षा व अन्य नगरसेवक मिळून एकूण १५ मते मिळाली. तर भाजपच्या शैलजा पुरूषोत्तम नारखेडे यांना तब्बल ३२ नगरसेवकांनी पाठिंबा दिला. या स्पष्ट बहुमताच्या आधारे पिठासीन अधिकाऱ्यांनी सौ. शैलजा नारखेडे यांच्या उपनगराध्यक्षपदी निवडीची अधिकृत घोषणा केली.
शैलजा नारखेडे आणि त्यांचे पती माजी नगरसेवक पुरूषोत्तम नारखेडे हे गेल्या तीस वर्षांपासून प्रभाग क्रमांक २१ मधून सातत्याने जनसेवा करत आहेत. नागरिकांशी असलेली जवळीक, विकासकामांचा अनुभव आणि संघटनात्मक ताकद याचा हा विजय मानला जात आहे.
या निवडणुकीत अपक्ष आसिफ खान (मक्का), काँग्रेसचे रोहन सूर्यवंशी, काजल मोरे तसेच अपक्ष मानवी आहुजा हे चार नगरसेवक तटस्थ राहिले. तरीही भाजपने दाखवलेल्या एकजुटीमुळे आणि अचूक रणनीतीमुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.



