मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा गाठला असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर सडकून टीका केली आहे. “मराठी माणसाचा विकास म्हणजे नक्की काय? गेल्या २५ वर्षांत मराठी माणसाला मुंबईबाहेर जावे लागले, हा विकास असू शकत नाही. तसेच परप्रांतियांना दोन थोबाडीत मारणे म्हणजे विकास नाही,” अशा शब्दांत त्यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांना टोला लगावला.

हिंदुत्वाची नवी व्याख्या आणि विकासाचा मुद्दा :
वरळीतील बीडीडी चाळीतील नागरिकांशी संवाद साधताना फडणवीस यांनी महायुतीच्या हिंदुत्वावर भाष्य केले. ते म्हणाले, “आमचे हिंदुत्व संकुचित नाही आणि ते केवळ पूजा पद्धतीवर अवलंबून नाही. जे भारतीय संस्कृती आणि प्राचीन जीवनपद्धती मानतात, ते सर्व हिंदू आहेत. हिंदुत्व आणि विकास हे एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत आणि मराठी माणूस हा हिंदूच आहे, हे विसरता कामा नये.”

‘भीतीसंगम’ आणि राजकीय भाकित :
ठाकरे बंधूंच्या युतीवर निशाणा साधताना फडणवीस यांनी त्याचा पुनरुच्चार ‘भीतीसंगम’ असा केला. “हा प्रीतीसंगम नसून पराभवाच्या भीतीतून झालेला संगम आहे,” असे ते म्हणाले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी विश्वास व्यक्त केला की, राज्यातील २६ ते २७ महानगरपालिकांमध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीचेच महापौर बसतील.
वरळीकरांच्या प्रश्नावर भूमिका :
बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या श्रेयवादाच्या लढाईत फडणवीसांनी स्वतः चाळीत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी चाळवासियांनी त्यांचे आभार मानले. मुंबईसह पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतही भाजप आणि महायुती सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.



