जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत, येथील प्रसिद्ध ‘अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल’मध्ये १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या ६९ व्या नॅशनल स्कूल गेम्स (योगासन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ ते १९ जानेवारी दरम्यान होणाऱ्या या भव्य राष्ट्रीय स्पर्धेत संपूर्ण भारतातील ३४ राज्यांचे आणि विविध बोर्डांचे संघ सहभागी होणार असून, योगासनातील नैपुण्य येथे पहायला मिळणार आहे.

दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार :
उद्घाटन या राष्ट्रीय स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दि. १७ जानेवारी रोजी सकाळी ८:३० वाजता अनुभूती स्कूलच्या बॅडमिंटन हॉलमध्ये संपन्न होईल. याप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन आणि प्राचार्य देबाशीस दास यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच सीआयएससीई बोर्डाचे वरिष्ठ अधिकारीही यावेळी हजर राहतील.

अशी असेल स्पर्धेची रूपरेषा :
स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया (SGFI) अंतर्गत होणाऱ्या या स्पर्धेत आर्टिस्टिक सिंगल, ट्रेडिशनल सिंगल, आर्टिस्टिक पेअर आणि रिदमिक पेअर अशा चार आव्हानात्मक प्रकारांत खेळाडू आपली कला सादर करतील. सेमी फायनल आणि फायनलच्या फेऱ्यांनंतर विजेत्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाने गौरवण्यात येईल. तसेच सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या संघाला ‘चॅम्पियन ट्रॉफी’ बहाल केली जाईल.
यजमानपदाचा मान ‘अनुभूती’ला :
यापूर्वी १७ वर्षांखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा, मुलींची फुटबॉल आणि तायक्वांडो यांसारख्या राष्ट्रीय स्पर्धांचे अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वी आयोजन केल्यामुळेच, SGFI कडून योगासन स्पर्धेची महत्त्वाची जबाबदारी पुन्हा एकदा अनुभूती स्कूलला देण्यात आली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक यांसह ३४ संघांमधील १६७ नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी डॉ. आरती पाल यांच्या नेतृत्वाखाली देशातील निष्णात पंचांची नियुक्ती करण्यात आली असून, जळगावकरांना राष्ट्रीय स्तरावरील योगकौशल्य पाहण्याची ही दुर्मिळ संधी मिळणार आहे.



