जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांसाठी जिल्हा परिषदांच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1,462 जागा भरण्यात येणार असून, संबंधित सर्व क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या निवडणुकीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. निवडणुकीची सूचना 16 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध होईल आणि त्याच दिवसापासून **उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 21 जानेवारी असून, ही प्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी त्यांच्या स्तरावर राबवतील. या वेळापत्रकानुसार ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्ताकारणात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. आचारसंहिता लागू झाल्याने प्रचार, घोषणा व प्रशासकीय निर्णयांवर निर्बंध राहतील.




