पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाने संघटनात्मक बांधणीला बळ देत महत्त्वाची जबाबदारी वाटप प्रक्रिया पूर्ण केली असून नगरसेवक अमृत नाना चौधरी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. आगामी उपनगराध्यक्ष निवडणूक आणि नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर ही निवड राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
नगरपरिषदेत होणाऱ्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीपूर्वी शिवसेना शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत अमृत नाना चौधरी यांची गटनेतेपदी, पंकज मराठे यांची उपगटनेतेपदी तर नितीन सोनार यांची प्रतोद म्हणून निवड करण्यात आली. पक्षातील सर्व नगरसेवकांच्या एकमताने ही निवड करण्यात आल्याने गटातील एकजूट अधोरेखित झाली आहे.

येत्या १५ जानेवारी रोजी पारोळा नगरपरिषदेची पहिलीच सर्वसाधारण सभा होणार असून याच दिवशी स्वीकृत नगरसेवक पदासाठी निवड प्रक्रिया पार पडणार आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नवनिर्वाचित नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील असणार आहेत. पहाटे ९:३० ते ११:३० या वेळेत उमेदवारांना नामांकन अर्ज दाखल करावे लागणार असून दुपारी १२ वाजता निवडीची घोषणा केली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी दिली आहे. याचवेळी स्वीकृत नगरसेवकांची नावेही जाहीर केली जाणार आहेत.
दरम्यान, जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील आणि नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. या प्रसंगी पक्षातील पदाधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, नगरसेवक प्रमोद कासार, नजीरखान बेलदार, भूषण टिपरे, नगरसेविका किरणताई पाटील, कविताताई मिस्तरी, पल्लवीताई जगदाळे, भाग्यश्रीताई अनुष्ठान, हमीदा बी. शेख, माजी उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, माजी नगरसेवक मनोज जगदाळे, मनीष पाटील, विनोद वाणी, जुबेर शेख, मोहम्मद पठाण, दिलीप पाटील यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे एरंडोल-पारोळा तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



