Home धर्म-समाज यावलमध्ये मुस्लीम समाजाचा आदर्श विवाह सोहळा

यावलमध्ये मुस्लीम समाजाचा आदर्श विवाह सोहळा


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात मुस्लीम समाजातील एका कुटुंबाने जुन्या रूढी-परंपरांना फाटा देत सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श विवाह सोहळा आयोजित केला असून, साखरपुड्यातच विवाह विधी पार पाडून समाजासमोर सादगी आणि सुज्ञतेचे उदाहरण ठेवले आहे. अनाठायी खर्च आणि वेळेचा अपव्यय टाळत साध्या पद्धतीने विवाह सोहळा संपन्न केल्याने शेख आणि खान कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सध्या सर्वत्र लग्नसमारंभांची धूम सुरू असून, मोठ्या प्रमाणावर खर्च, पाहुण्यांची गर्दी आणि दिखाऊपणाचे प्रमाण वाढलेले दिसून येते. अशा परिस्थितीत यावल येथील फालक नगर परिसरात आज दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी शेख कुटुंबीय आणि खान कुटुंबीयांनी एकत्र येत सामाजिक जाणीव ठेवून साखरपुड्यालाच विवाहात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे वेळ आणि खर्चाची बचत होण्यासोबतच समाजाला एक सकारात्मक संदेश मिळाला आहे.

पहूर पाळधी, जळगाव येथील रहिवासी असलेल्या वराच्या वडील जहीर खान आणि यावल येथील राहणारे वधूचे वडील आसिफ खान उर्फ इकबाल खान यांच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आला. वधू-वरांच्या दोन्ही कुटुंबीयांनी तसेच नातेवाईकांनी एकजुटीने हा विवाह साधेपणाने पार पाडण्याचा निर्धार केला. या उपक्रमात समीर खान (बिल्डर), आसिफ शेख, मजीद शेख, रशीद शेख, पप्पू शेख (बिल्डर), अफजल (वायरमन) यांच्यासह वधू-वरांचे नातेवाईक उपस्थित होते.

यावलचे मौलाना सामिउल्ला कादरी यांच्या उपस्थितीत कन्या हूरेन फातेमा आणि अजहर शेख यांचा निकाह अत्यंत साध्या आणि धार्मिक विधीनुसार पार पडला. कोणताही दिखावा न करता, समाजोपयोगी विचार डोळ्यासमोर ठेवून हा आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला. या उपक्रमामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून समाजात सादगी, सुज्ञता आणि सामाजिक जाणीव यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. अनावश्यक खर्च टाळून, विवाहासारखा पवित्र संस्कार साधेपणानेही पार पडू शकतो, हे या कुटुंबीयांनी दाखवून दिले आहे. समाजातील इतर कुटुंबीयांनीही या आदर्श उपक्रमातून प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा वधू-वरांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound