Home राजकीय महानगरपालिका निवडणुकीत म्हैसूर पेंट्सच्या ‘मार्कर पेन’ने उमटणार मतदानाची नवी निशाणी

महानगरपालिका निवडणुकीत म्हैसूर पेंट्सच्या ‘मार्कर पेन’ने उमटणार मतदानाची नवी निशाणी


छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर पोहोचणाऱ्या मतदारांना यंदा एक महत्त्वाचा बदल अनुभवायला मिळणार आहे. आतापर्यंत बाटलीतील शाईत काडी बुडवून बोटावर लावली जाणारी पारंपरिक पद्धत आता इतिहासजमा करण्यात आली असून, त्याऐवजी आधुनिक ‘मार्कर पेन’चा वापर केला जाणार आहे. निवडणूक प्रक्रियेत स्वच्छता, अचूकता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाकडून विशेष मार्कर पेन उपलब्ध करून देण्यात आले असून, हे पेन म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेडकडून तयार करण्यात आले आहेत. पुढील दोन दिवसांत ही सर्व मार्कर पेन मतदान केंद्रप्रमुखांना वितरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी प्रत्येक केंद्रावर या नव्या पद्धतीचा वापर केला जाईल.

या मार्कर पेनच्या शाईमागे ठोस वैज्ञानिक कारण आहे. या शाईमध्ये ‘सिल्व्हर नायट्रेट’ हा मुख्य घटक असून, बोटावर रेघ ओढल्यावर त्वचेतील प्रथिनांशी रासायनिक अभिक्रिया होते आणि ‘सिल्व्हर क्लोराईड’ तयार होते. परिणामी ही शाई पाण्याने किंवा साबणाने कितीही धुतली तरी निघत नाही. त्यामुळे पुन्हा मतदान करण्याचा कोणताही गैरप्रकार होऊ शकत नाही, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने हा बदल करण्यामागे काही ठोस कारणे दिली आहेत. शाई सांडून कपडे, टेबल किंवा कागदपत्रे खराब होण्याचा धोका आता टळणार आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा ताण कमी होईल. मार्कर पेनमुळे बोटावर अधिक सुबक, सरळ आणि स्पष्ट रेघ उमटवणे शक्य होणार आहे. तसेच रसायनयुक्त शाई पुसून टाकणे अशक्य असल्याने बोगस मतदानाला पूर्णपणे आळा बसेल, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे.

नियमानुसार, मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर नखापासून त्वचेपर्यंत उभी रेघ ओढली जाणार आहे. जर एखाद्या मतदाराचा डावा हात उपलब्ध नसेल, तर उजव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाईल. दोन्ही हात नसतील, तर पायाच्या बोटावर आणि अपवादात्मक परिस्थितीत पायही नसल्यास खांद्यावर शाई लावण्याची तरतूद नियमांमध्ये करण्यात आली आहे.

निवडणूक इतिहासात हा बदल पूर्णपणे नवा नाही. मागील डिसेंबरमध्ये झालेल्या नगर परिषद निवडणुकांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर मार्कर पेनचा वापर करण्यात आला होता आणि तो प्रयोग यशस्वी ठरला. त्या अनुभवाच्या आधारे आता महानगरपालिका निवडणुकांमध्येही हीच आधुनिक पद्धत राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


Protected Content

Play sound