जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिक्षण क्षेत्रात निःस्वार्थ सेवाभावातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान होणे ही अभिमानाची बाब मानली जाते. जळगाव येथील कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलचे उपक्रमशील व आदर्श इंग्रजी विषयाचे शिक्षक किरण विठ्ठल पाटील आणि किशोर प्रताप पाटील यांचा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे तर्फे विशेष सन्मान करण्यात आला आहे.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत शाळांमध्ये घेण्यात येणाऱ्या इंग्रजी प्रि-एलिमेंटरी, इंग्रजी एलिमेंटरी, इंग्रजी ज्युनिअर आणि इंग्रजी सीनियर या विविध स्पर्धांमध्ये इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन गेल्या १५ वर्षांपासून हे दोन्ही शिक्षक मोफत व निःशुल्क मार्गदर्शन करत आहेत. विशेष म्हणजे शाळेच्या नियमित वेळेव्यतिरिक्त सकाळी ११ ते १२ या वेळेत ते सातत्याने विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त अभ्यास वर्ग घेत आहेत.

या अथक परिश्रमांचे फलित म्हणून भगीरथ इंग्लिश स्कूलचा शैक्षणिक निकाल गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने १०० टक्के लागला आहे. या कालावधीत तब्बल २ हजार ३४२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत मोठी भर पडली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या या कार्यामुळे शाळेची ओळख जिल्ह्यात आदर्श शाळा म्हणून निर्माण झाली आहे.
या उल्लेखनीय योगदानाबद्दल टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने किरण पाटील आणि किशोर पाटील यांना अभिनंदनपत्र, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या गौरवामुळे शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रसंगी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक, अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, कार्यवाह अजित खाडीलकर, विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष सरिता साठे, विद्यापीठाच्या समन्वयक सारिका तांबे तसेच योगेश लाठी यांनी या दोन्ही शिक्षकांचे विशेष कौतुक केले. भविष्यातही असेच उत्कृष्ट कार्य करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी योगदान देत राहावे, अशा शुभेच्छाही मान्यवरांनी दिल्या.



