जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आदर्श नगर परिसरात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचाराला आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली असून, प्रभाग क्रमांक १३ मधील महायुतीच्या उमेदवारांचे माजी महापौर सदाशिव ढेकळे यांनी जल्लोषपूर्ण स्वागत करत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
प्रभाग क्रमांक १३ मधील महायुतीचे उमेदवार नितीन सपके, सुरेखा तायडे, प्रफुल्ल देवकर तसेच बिनविरोध उमेदवार वैशाली पाटील यांनी आज सकाळी आदर्श नगर परिसरातील हनुमान मंदिरापासून प्रचाराला सुरुवात केली. सकाळच्या वेळेतच उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत आपल्या विकासात्मक भूमिका मांडल्या.

हनुमान मंदिर परिसरानंतर शाळेजवळील भाग, आरटीओ ऑफिसच्या मागील परिसर तसेच उत्कर्ष हाऊसिंग सोसायटी या भागात उमेदवारांनी घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद साधला. प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांनीही उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रश्न, सूचना आणि अपेक्षा मांडल्या.
या प्रचार दौऱ्यादरम्यान माजी महापौर सदाशिव ढेकळे यांनी सर्व उमेदवारांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या. महायुतीच्या माध्यमातून आदर्श नगरच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. येणाऱ्या निवडणुकीत विजय महायुतीचाच होईल, असा विश्वासही त्यांनी उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना दिला.
प्रचारादरम्यान महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. घोषणाबाजी, संवाद आणि जनसंपर्काच्या माध्यमातून उमेदवारांनी आपली भूमिका प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवली असून, आगामी निवडणूक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.



