जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या रंगात आली असून, प्रभाग क्रमांक १६ मधील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. या प्रभागातून अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या हर्षाली कोल्हे आणि इच्छा अत्तरदे या दोन सुशिक्षित महिला उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही उमेदवारांचे उच्चशिक्षण आणि कामाची तळमळ पाहून परिसरातील तरुण-तरुणींनी यंदा परिवर्तनासाठी त्यांनाच मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
शिक्षणामुळे समस्यांची योग्य जाण :
प्रभाग १६ मधील विविध भागात सध्या प्रचार रॅली आणि कोपरा सभांचे आयोजन केले जात आहे. या दरम्यान स्थानिक तरुण मतदारांशी संवाद साधला असता त्यांनी आपला कल स्पष्ट केला. ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’शी बोलताना तरुणांनी सांगितले की, “आजवर अनेक प्रस्थापित नेत्यांना पाहिले, पण प्रभागातील रस्ते, पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न जैसे थे आहेत. हर्षाली कोल्हे आणि इच्छा अत्तरदे या दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित आहेत. शिक्षित नेतृत्व असल्यामुळे त्यांना तांत्रिक आणि प्रशासकीय प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे त्या आमच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडवू शकतात.”

तरुणाईचा ‘ताईं’नाच पाठिंबा प्रचारात :
सहभागी झालेल्या कॉलेजमधील युवक-युवतींनी “आमचे वोट ताईंनाच” अशा घोषणा देऊन वातावरण निर्मिती केली आहे. हर्षाली कोल्हे आणि इच्छा अत्तरदे यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या असून, त्यांनी मांडलेले विकासाचे ‘व्हिजन’ युवकांना भावत आहे. “आम्हाला असा लोकप्रतिनिधी हवा आहे जो फक्त निवडणुकीपुरता दिसणार नाही, तर शिक्षित असल्याने ज्याचा दृष्टिकोन आधुनिक असेल,” अशी भावना एका महाविद्यालयीन तरुणीने व्यक्त केली.
नवे नेतृत्व, नवी उमेद :
अपक्ष उमेदवार असूनही कोल्हे आणि अत्तरदे ताईंना मिळत असलेला प्रतिसाद पाहता प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. उच्चशिक्षित महिला राजकारणात आल्या तर प्रभागाचा चेहरामोहरा बदलू शकतो, या विश्वासाने प्रभाग १६ मधील मतदार यंदा बदलाच्या मूडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या प्रभागाची निवडणूक आता जळगाव शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.



