ठाणे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून अंबरनाथचे राजकारण सातत्याने चर्चेचा विषय ठरत आहे. काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडून सत्ता स्थापनेची तयारी करणाऱ्या भाजपला आता शिंदे गटाच्या शिवसेनेकडून जोरदार धक्का बसला असून, शिवसेना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्याच्या मार्गावर असल्याची राजकीय खळबळ उडाली आहे.

एका दिवसापूर्वी भाजपने काँग्रेसमधील 10 नगरसेवकांना आपल्या गोटात घेत सत्ता स्थापनेचा दावा मजबूत केल्याचे चित्र होते. मात्र, या राजकीय हालचालींना छेद देत शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आक्रमक खेळी करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेत भाजपच्या डावावर पाणी फेरले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेसच्या फुटीर नगरसेवकांच्या मदतीने सत्ता मिळवण्याचे भाजपचे स्वप्न या निर्णयामुळे धुसर झाले आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाचे तब्बल 27 नगरसेवक निवडून आले आहेत. या संख्याबळाला अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे चार नगरसेवक आणि एका अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा मिळाल्याने एकूण 32 नगरसेवकांचा मजबूत गट तयार झाला आहे. या संख्याबळाच्या जोरावर शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीने सत्ता स्थापनेचा दावा केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
निवडणूक निकालानंतर भाजपचे 16 नगरसेवक निवडून आले होते, तर शिवसेनेचे सर्वाधिक 27 नगरसेवक विजयी झाले होते. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने सुरुवातीला काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वरिष्ठ पातळीवरून नाराजी व्यक्त झाल्यानंतर भाजपने थेट काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडले. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करत सत्ता स्थापनेचा दावा भाजपने केला होता.
भाजपच्या या हालचालींनंतर शिंदे गटाच्या शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी वेळीच हस्तक्षेप करत सर्व शिवसेना नगरसेवकांना ठाण्यातील आनंद आश्रम येथे एकत्र केले. त्यानंतर शिवसेनेचे 27, राष्ट्रवादीचे चार आणि एका अपक्षाच्या पाठिंब्याने सत्ता स्थापनेचा अधिकृत दावा करण्यात आला असून, याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहे.
अंबरनाथमधील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता शिवसेना शिंदे गटाकडे 27, राष्ट्रवादीकडे चार, अपक्ष एक, भाजपकडे 16 तर काँग्रेसकडे 12 नगरसेवक आहेत, यातील 10 नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाल्याचे चित्र आहे. या संपूर्ण राजकीय समीकरणामुळे अंबरनाथमधील सत्तास्थापना अधिकच रंगतदार बनली आहे.
दरम्यान, अंबरनाथ नगरपरिषदेत नगराध्यक्षपदाची लढतही प्रतिष्ठेची ठरली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेनेच्या मनिषा वाळेकर आणि भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील विजयी झाल्या होत्या. नगराध्यक्षपद भाजपकडे असले तरी सर्वाधिक नगरसेवक शिवसेनेचे निवडून आल्याने सत्तेचा किल्ला कोणाच्या ताब्यात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



