जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सामाजिक बांधिलकी आणि लोककल्याणाचा आदर्श ठेवत जामनेर शहरात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेत आरोग्य तपासणी करून घेतली असून गरजू रुग्णांसाठी पुढील उपचारांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय तथा जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील बाबाजी राघव मंगल कार्यालयात या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जितेंद्र पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, रवींद्र झाल्टे यांच्यासह अनेक नगरसेवक व भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची सखोल तपासणी केली. रक्तदाब, मधुमेह, नेत्रतपासणी, अस्थिरोग, सर्वसाधारण तपासणी आदी सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. डॉक्टर विश्वनाथ चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की, शिबिरात हजाराहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली असून ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, त्यांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध झाली असून आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी आयोजकांचे व वैद्यकीय पथकाचे आभार मानत अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याची भावना व्यक्त केली.



