Home Cities जळगाव जळगावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अनुपस्थितीत महायुतीचा रोड शो 

जळगावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अनुपस्थितीत महायुतीचा रोड शो 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात महायुतीच्या प्रचाराला वेग आला असतानाच गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नियोजित रोड शो ऐनवेळी रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांचा हा रोड शो महत्त्वाचा मानला जात होता. मात्र, कोणतेही अधिकृत कारण जाहीर न होता उपमुख्यमंत्री शिंदे या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीत.

जळगाव शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली होती. महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रोड शोसाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर आकर्षक स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी बॅनर्स, झेंडे आणि फलक लावून संपूर्ण मार्ग भगवेमय करण्यात आला होता. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत होता. मात्र, ऐनवेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती समजताच काही प्रमाणात कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त झाली.

तरीही, राजकीय प्रचारात कोणताही खंड पडू नये यासाठी शिवसेना आणि महायुतीने तत्काळ हालचाली केल्या. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अनुपस्थितीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यांनी महायुतीच्या अन्य नेत्यांबरोबरच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेत नियोजित वेळेनुसार रोड शोला सुरुवात केली.

रोड शोच्या माध्यमातून जळगाव शहरातील विविध मार्गांवरून प्रचार रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. या रोड शोमध्ये आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार राजूमामा भोळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक नेते आणि उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती नसली तरी प्रचारात कोणतीही कमतरता भासू देणार नाही, असा ठाम संदेश यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून देण्यात आला. संघटनेची ताकद आणि महायुतीतील एकजूट दाखवून देत रोड शो यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.


Protected Content

Play sound