जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक शिस्तीचा कठोर संदेश देत मोठी कारवाई केली आहे. पक्षशिस्त, धोरणे व निर्णयांचे पालन न केल्याने पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याचे कारण पुढे करत भाजपने तब्बल 27 पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दि. 8 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत प्रेस नोटनुसार, संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षाची संघटनात्मक शिस्त धोक्यात येत असल्याचे पक्षाच्या निदर्शनास आले होते. या संदर्भात पक्षाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर पक्षहित लक्षात घेऊन हा कठोर निर्णय घेण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या निर्णयानुसार, संबंधित सर्वांचे भारतीय जनता पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले असून, सध्या भूषवत असलेली सर्व पदेही तात्काळ समाप्त करण्यात आली आहेत. हा निर्णय कोणतीही तडजोड न करता तात्काळ लागू राहील, असेही पक्षाने स्पष्ट केले आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षशिस्तीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशाराच या कारवाईतून देण्यात आला आहे.
हकालपट्टी करण्यात आलेल्या यादीत पाटील संगिता गोकुळ, भोळे गिरीष कैलास, हर्षदा अमोल सांगोरे, कैलास बुधा पाटील (सुर्यवंशी), बाविस्कर धनश्री गणेश, हेमंत सुभाष भंगाळे, बाविस्कर गणेश दत्तात्रय, जितेंद्र भगवान मराठे, सपकाळे रंजना भरत, प्रिया विनय केसवानी, कांचन विकास सोनवणे, चौधरी रुपाली स्वप्नील, शिंपी प्रमोद शातांराम, अंजू योगेश निबाळकर, सपकाळे भरत शंकर, चौथे मयुरी जितेंद्र, बागरे हिरकणी जितेंद्र, वंजारी जयश्री गजानन, चौधरी चेतना किशोर, पाटील ज्योती विठ्ठल, बारी मयुर श्रावण, घुगे उज्वला संजय, पाटील तृप्ती पाडुरंग, ढाकणे दिनेश मधुकर, पाटील सुनिल ज्ञानेश्वर, मोरे कोकीळा प्रमोद आणि विकास प्रल्हाद पाटील यांचा समावेश आहे.
ही कारवाई भाजपचे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आली असून, पक्ष संघटना अधिक मजबूत व शिस्तबद्ध ठेवण्यासाठी अशा निर्णयांची आवश्यकता असल्याचे पक्षनेतृत्वाचे मत आहे. या निर्णयामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली असून, निवडणुकांच्या आधी भाजपकडून आणखी कडक पावले उचलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



