Home राजकीय राहुल नार्वेकरांवरील धमकीच्या आरोपानंतर ; ठाकरे बंधूंसह सर्वपक्षीय ताकद तेजल पवारांच्या पाठीशी

राहुल नार्वेकरांवरील धमकीच्या आरोपानंतर ; ठाकरे बंधूंसह सर्वपक्षीय ताकद तेजल पवारांच्या पाठीशी


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मुंबईच्या कुलाबा परिसरातील वॉर्ड क्रमांक 226 सध्या राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरले असून, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर उमेदवार तेजल पवार यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वातावरण तापले आहे. धमकी, पैशांची मागणी आणि उलटसुलट आरोपांच्या फैरी झडत असताना, या वॉर्डमधील निवडणूक आता प्रतिष्ठेची आणि राजकीय ताकदीची चाचणी बनली आहे.

वॉर्ड क्रमांक 226 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या तेजल पवार यांनी राहुल नार्वेकर यांनी आपल्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकत धमकावल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे याच वॉर्डमधून राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर भाजपकडून निवडणूक रिंगणात असल्याने हा वाद अधिकच चिघळला. तेजल पवार यांनी पत्रकार परिषदेत थेट आरोप करत सांगितले की, आपल्याला 10 लाख रुपयांचे आमिष दाखवण्यात आले आणि नामांकन अर्ज मागे न घेतल्यास तडीपार करण्याची धमकी देण्यात आली.

या आरोपांना उत्तर देताना राहुल नार्वेकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. उलट त्यांनी असा दावा केला की, तेजल पवार यांचे पती दीपक पवार यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी 5 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, या दाव्यानंतरही राजकीय वर्तुळात संशयाची सुई नार्वेकरांकडेच वळताना दिसत आहे, कारण हे आरोप करण्यासाठी पाच दिवस का लागले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या संपूर्ण प्रकरणानंतर वॉर्ड क्रमांक 226 मधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. भाजपचे उमेदवार मकरंद नार्वेकर यांना रोखण्यासाठी जवळपास सर्व प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. मनसे, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांनी तेजल पवार यांना उघड पाठिंबा जाहीर केला आहे. मनसेने तेजल पवार यांना पुरस्कृत केले असून ठाकरे गटाने अधिकृत पाठिंबा दिल्याने या लढतीला वेगळेच वळण मिळाले आहे.

तेजल पवार सध्या जोरदार प्रचार करत असून, त्यांचा प्रचार रथ परिसरात विशेष लक्ष वेधून घेत आहे. या प्रचार रथावर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, शरद पवार, सोनिया गांधी, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या प्रतिमा झळकत असून, सर्वपक्षीय एकजुटीचे हे प्रतीक मानले जात आहे. त्यामुळे या वॉर्डमधील निवडणूक केवळ स्थानिक प्रश्नांपुरती मर्यादित न राहता, राज्यस्तरीय राजकारणाचे प्रतिबिंब बनली आहे.

दरम्यान, राहुल नार्वेकर यांच्या 5 कोटींच्या आरोपांवरही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. हरिभाऊ राठोड यांनी नार्वेकरांच्या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त करत, हे आरोप खोटे आणि बनावट नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. अपक्ष उमेदवारावर आरोप करण्यासाठी पाच दिवस लागणे हेच संशयास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.


Protected Content

Play sound