धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील सराई मोहल्ला परिसरात एका इराणी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेनंतर आता हे प्रकरण अधिक गंभीर वळणावर पोहोचले आहे. या महिलेला वर्षभरापासून आपल्या घरात आश्रय देणारे स्थानिक नागरिक रफिक मुसा कुरेशी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ‘राष्ट्रीय सुरक्षा मंच’ धरणगाव पोलीस प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केले आहे.

कायद्याचे उल्लंघन आणि संशयास्पद वास्तव्य :
राष्ट्रीय सुरक्षा मंचाने दिलेल्या तक्रारीनुसार, ७ जानेवारी रोजी पोलिसांच्या धाडीत ही महिला सापडली. कायद्यानुसार, कोणताही विदेशी नागरिक भारतात कोणाकडे राहात असेल, तर त्याबद्दलची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक असते. मात्र, रफिक कुरेशी यांनी गेल्या एक वर्षापासून ही माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवली, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सदर महिलेचा पासपोर्ट आणि व्हिसाची मुदत संपलेली असतानाही तिला आश्रय देणे हा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर धोका असल्याचे मंचाने म्हटले आहे.

देशद्रोहाचा संशय आणि चौकशीची मागणी :
या तक्रारीत धक्कादायक दावा करण्यात आला आहे की, या महिलेचा पती अफगाणी नागरिक आहे. इराण आणि अफगाणिस्तानच्या या जोडप्याचे भारतात कोणाकोणाशी संबंध आहेत आणि गेल्या वर्षभरात त्यांनी कोणत्या कारवाया केल्या, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. “हा केवळ आश्रयाचा विषय नसून, भारतात परदेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे आणून त्यांना नागरिकत्व मिळवून देण्याचा किंवा अतिरेकी कारवायांचा मोठा कट असू शकतो,” अशी शंका निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
आंदोलनाचा इशारा :
राष्ट्रीय सुरक्षा मंचाने पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना दिलेल्या या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की, केवळ महिलेला ताब्यात घेऊन उपयोग नाही, तर तिला आश्रय देणाऱ्या रफिक कुरेशी यालाही तात्काळ अटक करावी. त्यांच्याकडून गेल्या वर्षभरातील संपर्काची माहिती मिळवून सखोल चौकशी करण्यात यावी. जर प्रशासनाने यावर कठोर कारवाई केली नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन आणि आमरण उपोषण छेडण्याचा इशारा संयोजक व सदस्यांनी दिला आहे.



