
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा पारा आता चांगलाच चढला असून, प्रभाग क्रमांक १६ मध्ये अपक्ष उमेदवारांनी प्रस्थापित राजकीय पक्षांच्या चिंतेत भर घातली आहे. प्रभाग १६ ‘अ’ आणि ‘ब’ मधील अपक्ष उमेदवार हर्षाली मनीष कोल्हे आणि इच्छा दीपक अत्तरदे यांनी गुरुवारी अयोध्या नगर परिसरात भव्य प्रचार रॅली काढत आपल्या शक्तीप्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

धार्मिक स्थळांच्या दर्शनाने प्रचाराचा प्रारंभ :
प्रचारात एक वेगळी रणनीती आखत या दोन्ही महिला उमेदवारांनी ‘आघाडी’च्या माध्यमातून एकत्रित प्रचार सुरू केला आहे. अयोध्या नगर येथील हनुमान मंदिरामध्ये आरती करून आणि हनुमानाचा आशीर्वाद घेऊन या रॅलीला सुरुवात झाली. रॅलीच्या अग्रभागी ढोल-ताशांचा पथक असल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
विस्तीर्ण पदयात्रा आणि जनसंपर्क :
ही प्रचार रॅली अयोध्या नगर भागातून सुरू होऊन राम मंदिर, रायसोनी शाळा, शांती निकेतन आणि अजिंठा हाऊसिंग सोसायटीपर्यंत पोहोचली. त्यानंतर खाटू श्याम मंदिर, ऑटो नगर, कालिंका माता मंदिर, बारा ज्योतीर्लिंग परिसर, हिरा पाईप आणि एस.टी. वर्कशॉप यांसारख्या प्रमुख भागांतून रॅली मार्गस्थ झाली. या दीर्घ पदयात्रेदरम्यान दोन्ही उमेदवारांनी प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर जाऊन मतदारांशी संवाद साधला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
मुलभूत सुविधांचा दिला शब्द :
प्रचारात मतदारांशी चर्चा करताना हर्षाली कोल्हे आणि इच्छा अत्तरदे यांनी स्थानिक समस्यांकडे अधिक लक्ष दिले. “रस्ते, पाणी आणि पथदिवे यांसारख्या मुलभूत सुविधांसाठी नागरिकांना वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागत आहे. आम्हाला संधी मिळाल्यास या प्रश्नांचा कायमचा निकाल लावू,” असे आश्वासन त्यांनी दिले.
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :
प्रत्येक गल्लीत या रॅलीचे स्वागत नागरिकांनी, विशेषतः महिलांनी उत्स्फूर्तपणे केले. अनेक ठिकाणी उमेदवारांचे औक्षण करण्यात आले. अपक्ष असूनही कोल्हे आणि अत्तरदे यांना मिळणारा हा प्रतिसाद पाहता, प्रभाग १६ मध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवक आणि महिला समर्थक सहभागी झाले होते, ज्यामुळे हा भाग पूर्णपणे निवडणूक मय झाला होता.



