जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणारी घडामोड समोर आली आहे. जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे जिल्ह्याच्या विशेषतः ग्रामीण भागातील भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली असून राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली आहे.

दिग्गज नेत्यांची उपस्थिती :
जळगाव येथील एका विशेष सोहळ्यात राज्याचे मंत्री ना. गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी, संजय गरुड आणि अशोक कांडेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी प्रभाकर अप्पांचे स्वागत करून त्यांना पक्षाचा दुपट्टा देऊन सन्मानित करण्यात आले.

अनुभवाचा पक्षाला फायदा :
मंत्री गिरीश महाजन यावेळी बोलताना ना. गिरीश महाजन म्हणाले की, “प्रभाकर अप्पा सोनवणे यांचा प्रशासकीय आणि सामाजिक कार्याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी समाजकल्याण सभापती म्हणून केलेले कार्य कौतुकास्पद असून, त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला जिल्ह्याच्या विकासकामात मोठी मदत होईल.”
‘विकासासाठी भाजपची विचारधारा आवश्यक’
आपली भूमिका स्पष्ट करताना प्रभाकर अप्पा सोनवणे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विकासकामे आणि भाजपची सर्वसमावेशक विचारधारा पाहून मी हा निर्णय घेतला आहे. जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भाजप हेच योग्य व्यासपीठ आहे, असा माझा विश्वास आहे.”
प्रभाकर अप्पांच्या या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, इतर पक्षांतील कार्यकर्त्यांमध्येही मोठी चलबिचल पाहायला मिळत आहे. या सोहळ्याला जिल्हभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



