अकोला-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचे आज सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. काल त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात नातेवाईक, समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून वातावरण शोकाकुल झाले आहे.

हिदायत पटेल यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार होणार असून, त्यापूर्वी कुटुंबीयांनी आणि समर्थकांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे. “आरोपींना अटक झाली नाही, तर मृतदेह थेट पोलीस ठाण्यात नेऊन ठेवण्यात येईल,” असा इशारा कुटुंबीयांनी दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनावर वाढता दबाव स्पष्टपणे जाणवत आहे.

हिदायत पटेल हल्ला प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राजकीय क्षेत्रातील मोठ्या नावांचा समावेश असल्याने प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे. आरोपींमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडखे, काँग्रेसचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती राजीव बोचे यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्यक्ष हल्लेखोर उबेद पटेल आणि आणखी एका व्यक्तीवरही गुन्हा दाखल आहे.
काल अकोट तालुक्यातील मोहाळा गावात हिदायत पटेल यांच्यावर उबेद पटेल या तरुणाने हल्ला केल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या पटेल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, हल्लेखोर आरोपी उबेद पटेल याला अकोट तालुक्यातील पणज गावातून रात्री अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पोलीस तपासाला वेग देण्यात आला आहे.
सध्या या प्रकरणात सुरुवातीला ‘खुनाचा प्रयत्न’ आणि ‘कट रचणे’ या आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र हिदायत पटेल यांच्या मृत्यूनंतर आता या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पटेल कुटुंबीयांच्या तक्रारीत प्रभावशाली राजकीय नेत्यांची नावे असल्याने तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
हिदायत पटेल यांच्या मृत्यूमुळे अकोला जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भाच्या राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, काँग्रेस पक्षाने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. निष्पक्ष आणि कठोर कारवाईची मागणी करत दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे.



