जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीच्या उमेदवारांनी आता प्रचाराचा वेग प्रचंड वाढवला असून, मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. मंगळवार, ६ जानेवारी रोजी महायुतीचे अधिकृत उमेदवार नितीन सपके, सुरेखा नितीन तायडे आणि प्रफुल्ल गुलाबराव देवकर यांनी प्रभागातील विविध उपनगरांमध्ये पायी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले.

बिनविरोध उमेदवाराचा सक्रिय सहभाग :
या प्रचार दौऱ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे, प्रभाग १३ मधून आधीच बिनविरोध निवडून आलेल्या महायुतीच्या उमेदवार वैशाली अमित पाटील यांचा सहभाग. स्वतःची जागा सुरक्षित असूनही, महायुतीचे पूर्ण पॅनेल निवडून आणण्यासाठी त्यांनी रॅलीत सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी नागरिकांनी वैशाली पाटील यांचा बिनविरोध निवडीबद्दल ठिकठिकाणी सत्कार केला, तर इतर उमेदवारांचे महिलांनी औक्षण करून जल्लोषात स्वागत केले.

विकासाच्या मुद्द्यावर भर :
राकेश नगर, पार्वती काळे नगर आणि गाडगे बाबा चौक या भागांमध्ये उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी बोलताना उमेदवारांनी सांगितले की, “आमदार राजूमामा भोळे यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत प्रभागामध्ये रस्ते, पाणी आणि दिवाबत्तीची अनेक महत्त्वाची विकासकामे पूर्ण झाली आहेत. याच विकासकामांच्या जोरावर आम्ही जनतेचे आशीर्वाद मागायला आलो आहोत.” प्रभागाचा उर्वरित विकास आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महायुतीचे संपूर्ण पॅनेल विजयी करणे आवश्यक असल्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
मतदारांचा वाढता पाठिंबा :
सकाळी १० वाजता सुरू झालेली ही प्रचार फेरी दुपारपर्यंत प्रभागातील विविध भागात फिरली. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर निवडणूक मय झाला होता. विशेषतः महिला मतदारांमध्ये या उमेदवारांबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. ठिकठिकाणी झालेल्या या जंगी स्वागतामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, प्रभाग १३ मध्ये महायुतीचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे.



