जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारणात नवी खळबळ उडाली असून आम आदमी पार्टीतर्फे संजय प्रभाकर निकुंभ यांनी महायुतीच्या विरोधात उघड एल्गार पुकारला आहे. विशेष म्हणजे, एकाच वेळी तीन प्रभागांतून प्रतिकात्मक उमेदवारी दाखल करत त्यांनी सत्ताधारी व विरोधी दोन्ही आघाड्यांना थेट आव्हान दिले आहे.

शहरातील सार्वजनिक जीवनात सातत्याने सक्रिय असलेले, विशेषतः सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे संजय निकुंभ यांनी प्रभाग क्रमांक ४, १२ आणि १३ मधून उमेदवारी दाखल केली आहे. ‘इलेक्टेबल मेरिट’च्या नावाखाली डावलल्या जाणाऱ्या सर्वपक्षीय सामान्य कार्यकर्त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी ही उमेदवारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सांस्कृतिक क्षेत्रातील उपेक्षित घटकांना न्याय मिळावा आणि सामान्य कार्यकर्त्यांचे प्रश्न ऐकले जावेत, यासाठी ही लढाई असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी न पडता, लोकवर्गणीच्या माध्यमातून शेवटपर्यंत निवडणूक लढवण्याचा संकल्प संजय निकुंभ यांनी जाहीर केला आहे. राजकीय पाठबळापेक्षा जनतेचा विश्वास आणि प्रत्यक्ष कामगिरीच्या जोरावर निवडणुकीत उतरल्यानामुळे त्यांच्या भूमिकेची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्यभरातील महापालिका निवडणुकांमध्ये एका तिकिटासाठी मोठी चुरस असताना, आम आदमी पार्टीने एका सामान्य कार्यकर्त्याला तब्बल तीन प्रभागांतून उमेदवारी देणे ही बाब राजकीय वर्तुळात आश्चर्याची मानली जात आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची ‘सामान्य माणसाला संधी’ देण्याची भूमिका यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे बोलले जात आहे.
प्रभाग क्रमांक ४, १२ आणि १३ मध्ये संजय निकुंभ यांच्यासमोर महायुतीसह इतर घटक पक्षांचे बलाढ्य उमेदवार उभे ठाकले आहेत. मात्र कोणतीही तडजोड न स्वीकारता, थेट संवाद आणि जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तिन्ही प्रभागांत एकट्याने शड्डू ठोकल्याने त्यांची उमेदवारी सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.
एकूणच, महायुतीविरोधात उघड भूमिका घेत तीन प्रभागांतून निवडणूक रिंगणात उतरलेले संजय निकुंभ हे शहरातील राजकारणात ‘सामान्य कार्यकर्ता विरुद्ध प्रस्थापित राजकारण’ अशी नवी लढत उभी करत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.



