मुंबई-वृत्तसेवा | मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर गंभीर आरोप करत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर देशातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. १९९७ ते २०२२ या २५ वर्षांच्या कालावधीत मुंबई महापालिकेत तब्बल ३ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला असून, हा आकडा देशातील २जी, कोल स्कॅम किंवा कॉमनवेल्थ गेम्ससारख्या गाजलेल्या घोटाळ्यांपेक्षा कितीतरी पटीने मोठा असल्याचे त्यांनी सांगितले.

साटम यांनी म्हटले की, देशातील आतापर्यंतचे सर्व मोठे घोटाळे मिळूनही १ लाख ७६ हजार कोटींच्या पुढे गेले नाहीत, मात्र मुंबईसारख्या एका महापालिकेत इतका मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला, हे धक्कादायक आहे. या संपूर्ण कारभाराला तत्कालीन सत्ताधारी जबाबदार असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.

मुंबई महापालिकेची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे सांगत साटम यांनी आपल्या भावना कवितेच्या माध्यमातून व्यक्त केल्या. या कवितेतून त्यांनी महापालिकेच्या लुटीचा हिशोब जनता आगामी निवडणुकीत घेईल, असा इशाराही दिला.
मुंबईतील रस्त्यांच्या प्रश्नावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. माहिती अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीचा हवाला देत, केवळ गेल्या दहा वर्षांत रस्त्यांच्या कामांवर २१ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एवढा प्रचंड खर्च होऊनही मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने, “रस्त्यांत खड्डे की खड्ड्यांत रस्ते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या अपयशाची जबाबदारी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर असल्याचा आरोप साटम यांनी केला.
ठाकरे यांच्या कार्यकाळातील विविध कथित घोटाळ्यांची यादी मांडताना साटम यांनी शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहार, पाणी प्रकल्प रद्द करून झालेला आर्थिक नुकसान, कचरा व्यवस्थापनातील भ्रष्टाचार, जाहिरात उत्पन्नातील अपहार तसेच १७०० बार व रेस्टॉरंटमधून झालेल्या कथित वसुलीचा उल्लेख केला. कोविड काळात उभारण्यात आलेल्या महालक्ष्मी कोविड सेंटरबाबतही त्यांनी संशय व्यक्त करत, बिल्डरच्या फायद्यासाठीच हे सेंटर उभारण्यात आल्याचा आरोप केला.
कोविड काळात बॉडी बॅग, पीपीई किट खरेदीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा दावा करत त्यांनी परदेशी पत्रकारांच्या ट्विट्सचाही उल्लेख केला. महापालिकेची स्थायी समिती ‘रिमोट कंट्रोल’ने चालवली जात असल्याचा आरोप करत, सर्व निर्णय एका व्यक्तीच्या इशाऱ्यावर होत असल्याचे साटम यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत म्हटले की, जर ठाकरे गटाचा महापौर झाला तर मुंबईची वाटचाल चुकीच्या दिशेने जाईल. “२५ वर्षांत मराठी माणसासाठी केलेले एकही ठोस काम दाखवावे,” असे आव्हान देत, भाजपने बीडीडी चाळ पुनर्विकासासारखी कामे केल्याचे त्यांनी नमूद केले.
आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीचाच महापौर होईल आणि मुंबईवर भगवा फडकणार, असा ठाम विश्वास व्यक्त करत साटम यांनी विरोधकांच्या बिनविरोध निवडणुकीच्या मुद्द्यावरही सवाल उपस्थित केले. उद्धव ठाकरे यांची टीका ही केवळ भाजपवर नसून मराठी जनतेवर असल्याचा दावा त्यांनी केला.



