Home धर्म-समाज शिर्डी महोत्सवात साईबाबांच्या चरणी विक्रमी दान; अवघ्या 9 दिवसांत 23.29 कोटींची देणगी 

शिर्डी महोत्सवात साईबाबांच्या चरणी विक्रमी दान; अवघ्या 9 दिवसांत 23.29 कोटींची देणगी 


शिर्डी-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । नाताळची सुट्टी, सरत्या वर्षाचा निरोप आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर आयोजित शिर्डी महोत्सवात साईभक्तांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले असून साईबाबांच्या चरणी अर्पण झालेल्या विक्रमी देणगीमुळे अवघा देश थक्क झाला आहे.

२५ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या नऊ दिवसांच्या कालावधीत सुमारे ८ लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या काळात भाविकांनी श्रद्धेने एकूण २३ कोटी २९ लाख २३ हजार ३७३ रुपयांची रेकॉर्डब्रेक देणगी साई संस्थानला अर्पण केली, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. दरवर्षी होणाऱ्या महोत्सवांच्या तुलनेत यंदा दानरकमेने नवा उच्चांक गाठल्याचे त्यांनी नमूद केले.

महोत्सवाच्या काळात दान विविध माध्यमांतून प्राप्त झाले. दानपेटीतून ६ कोटी २ लाख ६१ हजार ६ रुपये, देणगी काउंटरद्वारे ३ कोटी २२ लाख ४३ हजार ३८८ रुपये, तर पीआरओ सशुल्क पासद्वारे २ कोटी ४२ लाख ६० हजार रुपये संस्थानला मिळाले. बदलत्या काळानुसार डिजिटल देणगीलाही भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला असून डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक व मनीऑर्डरद्वारे तब्बल १० कोटी १८ लाख ८६ हजार ९५५ रुपये जमा झाले आहेत.

देशासह परदेशातील साईभक्तांनीही मोठ्या प्रमाणावर दान अर्पण केले. २६ देशांच्या परकीय चलनातून १६ लाख ८३ हजार ६७३ रुपये संस्थानला प्राप्त झाले. सोने-चांदीच्या स्वरूपातील दानही लक्षणीय असून २९३ ग्रॅम सोने, ज्याची किंमत सुमारे ३६.३८ लाख रुपये आहे, तसेच सुमारे ६ किलो चांदी, ज्याची किंमत ९.४९ लाख रुपये आहे, असे दान मिळाले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एका साईभक्ताने ८० लाख रुपये किमतीचा आकर्षक सुवर्ण व हिरेजडीत मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण केल्याने भाविकांमध्ये विशेष चर्चेला उधाण आले. या मुकुटात १५३ कॅरेटचे हिरे आणि ५८६ ग्रॅम शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे.

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन साई संस्थानने दर्शन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केले होते. त्याचबरोबर अन्नदानाची परंपरा मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली. या नऊ दिवसांत ६ लाखांहून अधिक भाविकांनी साई प्रसादालयात मोफत भोजनाचा लाभ घेतला, तर १ लाख ९ हजार भाविकांना अन्न पाकिटांचे वाटप करण्यात आले. याच कालावधीत ७ लाख ६७ हजार लाडू पाकिटांच्या विक्रीतून २.३० कोटी रुपये उत्पन्न मिळाले असून ५ लाख ७६ हजार भाविकांना मोफत बुंदी प्रसादाचे वितरण करण्यात आले.

साई संस्थानला प्राप्त होणाऱ्या देणग्यांचा उपयोग विविध लोककल्याणकारी उपक्रमांसाठी केला जात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्पष्ट केले. साईबाबा रुग्णालय व साईनाथ रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, मोफत भोजन व्यवस्था, शैक्षणिक संस्थांचे संचालन तसेच सामाजिक आणि लोकहिताच्या योजनांसाठी या निधीचा विनियोग केला जातो. महोत्सव काळात सर्व विभागांचे कर्मचारी, स्वयंसेवक आणि सुरक्षा यंत्रणांनी भाविकांना सुरक्षित व सुलभ दर्शन मिळावे यासाठी विशेष परिश्रम घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

एकूणच, शिर्डी महोत्सवाने साईभक्तांची अपार श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली असून विक्रमी दानामुळे लोककल्याणाच्या कार्याला आणखी बळ मिळणार आहे.


Protected Content

Play sound