मुंबई-वृत्तसेवा मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मुंबईकरांसाठीचा वचननामा जाहीर केला. यावेळी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निलंबनाची मागणी केली.

राज्यात लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाली असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे म्हणाले की, मतचोरीनंतर आता उमेदवारांवर दबाव टाकून त्यांना माघार घ्यायला भाग पाडले जात आहे. धमक्यांच्या माध्यमातून निवडणुका बिनविरोध केल्या जात असून हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संवैधानिक पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत, निवडणूक आयोगाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी आणि त्यांना अध्यक्षपदावरून निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली.

अध्यक्ष कोणत्याही पक्षाचा नसतो आणि तो आमदारासारखा वागू शकत नाही, असे स्पष्ट करत ठाकरेंनी नार्वेकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दमदाटी करून बिनविरोध उमेदवार निवडून आणणे म्हणजे मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत, तिथे पुन्हा निवडणुका घेण्यात याव्यात, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
विधानसभा अध्यक्षांना सभागृहात अधिकार असतात, मात्र संरक्षण काढून घेण्यासारखे आदेश देणे हे त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर असल्याचे ठाकरेंनी नमूद केले. अध्यक्ष कोणत्याही पक्षाच्या प्रचारासाठी किंवा समर्थनासाठी जाऊ शकत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या आर्थिक व्यवस्थापनावरही भाष्य केले. मुंबई महापालिकेच्या निधीतून कोस्टल रोडसारखा मोठा प्रकल्प टोलमुक्त उभारण्यात आला, हे सांगत त्यांनी महापालिकेकडे एकेकाळी सुमारे ९२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी असल्याचे नमूद केले. याच ठेवींमधून विकासकामे करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ठाकरेंनी, “ठेवी या काही चाटायला नसतात आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटण्यासाठीही नसतात,” असा जोरदार टोला लगावला. महायुती सरकारने सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती आपल्याकडे असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.



