जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मोठ्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार साहिल शहा सत्तार शहा आणि त्याचा साथीदार अनस शहा अबुबकर शहा या दोन फरार आरोपींना पोलिसांनी धुळे व जळगाव परिसरातून शिताफीने अटक केली आहे. या कारवाईमुळे आतापर्यंत या गुन्ह्यात एकूण १७ लाख ३६ हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
तपासाचे चक्र आणि अटक:
यावल येथील या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी याआधीच तीन आरोपींना अटक केली होती. मात्र, मुख्य सूत्रधार साहिल शहा फरार होता. तो धुळे-चोपडा रोडवर आल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले, तर दुसरा आरोपी अनस शहा याला जळगाव परिसरातून पकडण्यात आले.

कुख्यात गुन्हेगाराची पार्श्वभूमी:
अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी साहिल शहा हा धुळ्यातील आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत आणि अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी घरफोडी, वाहन चोरी, मंदिर चोरी आणि अंमली पदार्थ कायद्यान्वये सहापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांची मोठी वसुली:
नुकत्याच अटक केलेल्या या दोन आरोपींकडून ३ लाख ४२ हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत. यासह या गुन्ह्यातील जप्त केलेली एकूण रक्कम आता १७ लाख ३६ हजार रुपयांवर पोहोचली आहे. ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.



