Home राजकीय बिघडलेले गाव सुधारण्यासाठी पाटील-कुलकर्ण्यांना युती करावी लागते : विश्वास पाटील

बिघडलेले गाव सुधारण्यासाठी पाटील-कुलकर्ण्यांना युती करावी लागते : विश्वास पाटील


सातारा-वृत्तसेवा । मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी “बिघडलेले गाव सुधारायचे असेल तर पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते,” असे विधान करत सामाजिक चर्चेला नवी धार दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याने साहित्यिक व राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. यावेळी कुलकर्णी व जोशींनी “मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष एका पाटलाला करा,” अशी मागणी केल्याचेही त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात विश्वास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत साताऱ्याची गौरवगाथा मांडली. साहित्य संमेलन हा केवळ कार्यक्रम नसून आचार, विचार आणि देशाला दिशा देणारा उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीपासून साहित्य संमेलनाची परंपरा असल्याचे सांगत, एका शेतकऱ्याच्या मुलाला अध्यक्षपद मिळणे ही मोठी गोष्ट असल्याचे ते म्हणाले.

‘मी शब्दांच्या फडात रमणारा पाटील’
“पाटील म्हटले की कुस्तीचा फड, तमाशाचा फड आणि उसाचा फड डोळ्यांसमोर येतो; पण मी शब्दांच्या फडात रमणारा पाटील आहे,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. बिघडलेले गाव सुधारण्यासाठी पाटील–कुलकर्णी युती ही आपली जुनी वहिवाट असल्याचेही त्यांनी ठासून सांगितले.

अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्यावा
विश्वास पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची जोरदार मागणी केली. स्वातंत्र्यवीर सावरकर, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि साहित्यिकांच्या लढ्याचा संदर्भ देत त्यांनी मातृभाषेच्या रक्षणासाठी साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली. दलित साहित्य मराठी साहित्यात वाखाणण्याजोगे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

‘आचारसंहिता तुमची, विचारसंहिता आमची’
सध्याचा काळ राजकीयदृष्ट्या नाजूक असल्याचे सांगत, आचारसंहिता तात्पुरती असते; मात्र साहित्यिकांच्या लेखणीतून निघणारे स्फुलिंग पिढ्यान्‌पिढ्या प्रवास करतात, असे ते म्हणाले. संयुक्त महाराष्ट्रासाठी झटलेल्या कार्यकर्त्याच्या पुत्राला आणि आयुष्यभर शेती करणाऱ्या अशिक्षित शेतकरी मातेच्या पुत्राला अध्यक्षपद दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

विश्वास पाटील यांच्या या स्पष्ट आणि रोखठोक भूमिकेमुळे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून समाज, संस्कृती आणि राजकारणावरील चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे.


Protected Content

Play sound