Home राजकीय ठाकरे बंधूच्या युतीत खळबळ; मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

ठाकरे बंधूच्या युतीत खळबळ; मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे


मुंबई–वृत्तसेवा । ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असतानाच, मनसेला मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील मनसेचे तब्बल 11 संस्थापक व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकाचवेळी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या घडामोडीचा थेट परिणाम दोन किंवा त्याहून अधिक वॉर्डांमध्ये ठाकरे बंधूंच्या आघाडीला सहन करावा लागू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची अधिकृत घोषणा केल्यानंतर मराठी मतांचे विभाजन टळेल आणि त्याचा फायदा ठाकरे बंधूंच्या आघाडीला होईल, असा दावा करण्यात येत होता. मात्र, याच पार्श्वभूमीवर मुंबईतील वांद्रे भागातून मनसेच्या गोटात मोठी फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे. वांद्रे येथील मनसेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 97 आणि 98 मधील तब्बल 11 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे आणि पक्षाच्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत.

या दोन प्रभागांपैकी एक प्रभाग ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्याने आणि तेथे ‘तुतारी’ चिन्हावर उमेदवार उभा राहिल्यामुळे स्थानिक मनसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. मनसेच्या इच्छुक उमेदवारांना डावलण्यात आल्याचा आरोप करत, गेल्या जवळपास दोन दशके राज ठाकरे यांच्यासोबत निष्ठेने काम केलेल्या या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, या सर्व पदाधिकाऱ्यांचा राजकीय प्रवास पक्ष स्थापनेपासूनचा असून, त्यांनी 19 वर्षे 9 महिने मनसेसाठी काम केले आहे.

राजीनामा पत्रात त्यांनी केवळ एका ओळीत, ‘9 मार्च 2006 ते 31 डिसेंबर 2025 असा 19 वर्षे 9 महिन्यांचा अविस्मरणीय राजकीय प्रवास… अखेरचा जय महाराष्ट्र,’ असा उल्लेख करत आपली भावना व्यक्त केली आहे. या ओळीमधून आपल्याला सातत्याने डावलले जात असल्याची खंत त्यांनी अप्रत्यक्षपणे मांडल्याचे बोलले जात आहे. या राजीनाम्यांमुळे मनसेच्या अंतर्गत संघटनात्मक बांधणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, येत्या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेने अनेक वॉर्डांमध्ये आपले उमेदवार जाहीर केले आहेत. विविध वॉर्डांतून उमेदवार मैदानात उतरवण्यात आले असले तरी, वांद्रे परिसरातील उमेदवारीवरून निर्माण झालेला वाद आता उघडपणे समोर आला आहे. एका बाजूला ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मोठा राजकीय संदेश दिला जात असताना, दुसऱ्या बाजूला स्थानिक पातळीवर नाराजी आणि राजीनाम्यांची मालिका सुरू झाल्याने ही युती कितपत यशस्वी ठरेल, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

एकंदरीत, ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठी मतांचे गणित बदलणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच, मनसेतील अंतर्गत असंतोष आणि 11 प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे ही बाब या राजकीय समीकरणांना नवे वळण देणारी ठरत आहे. आगामी काळात याचे पडसाद थेट निवडणूक निकालांमध्ये उमटतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound