चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य दिनानिमित्त चोपडा शहरात भीमसैनिकांनी रक्तदान करून सैनिकांच्या शौर्याला अभिवादन केले. सामाजिक बांधिलकी जपत आणि ऐतिहासिक परंपरेचा सन्मान राखत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला शहरासह तालुक्यातून मोठा प्रतिसाद लाभला.
१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर कोरेगाव भीमा (पुणे) येथील विजयी स्मारकाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. या ठिकाणी तालुकाभरातून आलेल्या भीमसैनिकांनी एकत्र येत सैनिकांच्या शौर्याला सलामी दिली. प्रतिकृतीसमोर शौर्यचक्र अर्पण करून पुष्पांजली वाहण्यात आली आणि हा ऐतिहासिक दिवस अत्यंत शिस्तबद्ध व शांततेच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. या थोर महापुरुषांच्या विचारांना उजाळा देत सामाजिक समता, बंधुता आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश उपस्थितांना देण्यात आला.
या कार्यक्रमास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, गोपाळराव सोनवणे, भन्तेजी, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष बापुराव वाणी, शहराध्यक्ष भरत शिरसाठ यांच्यासह दिवाणजी साळुंखे, दिपक वानखेडे, समाधान सपकाळे, प्रवीण करंकाळ, सुदाम करंकाळ, रमेश सोनवणे, पिंटू शिरसाठ, प्रवीण बाविस्कर, वसंत शिंदे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. शेकडो भीमसैनिकांनी यावेळी शौर्य दिनास अभिवादन केले.
शौर्य दिनाचे औचित्य साधून आयोजित रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने पाण्याचा एक जार देण्यात आला. हे रक्त संकलन स्व. मुकेशभाई पटेल ब्लड सेंटर, शिरपूर यांच्या माध्यमातून भटू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
एकूणच, शौर्य दिनाच्या निमित्ताने चोपड्यात आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम इतिहासाचे स्मरण, सामाजिक एकोप्याचे दर्शन आणि मानवतेसाठी केलेल्या रक्तदानामुळे अर्थपूर्ण ठरला.



