मुंबई– लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। राज्यात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असताना उमेदवारी अर्जांची छाननी आणि अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेतून राजकीय चित्र अधिक स्पष्ट होत आहे. काही ठिकाणी पक्षांना मोठे धक्के बसत असतानाच, अनेक महानगरपालिकांमध्ये बिनविरोध विजयाचे गुलाल उधळले जात आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत (केडीएमसी) भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीने मतदानापूर्वीच विजयाचा जल्लोष सुरू केला आहे.

केडीएमसीत भाजपचे 5 आणि शिवसेना शिंदे गटाचे 4 असे एकूण 9 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. 122 सदस्यसंख्या असलेल्या या महापालिकेत सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेल्या 62 जागांपैकी महायुती आता केवळ 53 जागा दूर आहे. त्यामुळे भाजप व शिवसेना शिंदे गटात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

भाजपकडून बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेंकर, मंदा पाटील यांच्यासह प्रभाग क्रमांक 24 ब मधून ज्योती पवन पाटील यांचा समावेश आहे. ज्योती पाटील यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजपच्या बिनविरोध विजयी उमेदवारांची संख्या पाचवर पोहोचली आहे. या यशामागे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रणनीती यशस्वी ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानेही केडीएमसीत आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. पॅनल क्रमांक 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली रणजित जोशी तर प्रभाग क्रमांक 28 अ मधून हर्षल राजेश मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सर्व अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने या जागांवरील निवडणुका बिनविरोध झाल्या असून, या यशाचे श्रेय खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रभावी खेळीला दिले जात आहे.
केवळ केडीएमसीपुरतेच नव्हे तर राज्यभरातही महायुतीची घोडदौड सुरू असल्याचे चित्र आहे. भाजपने धुळे महानगरपालिकेत दोन आणि पनवेल महानगरपालिकेत एका जागेवर बिनविरोध विजय मिळवत राज्यात एकूण आठ जागा बिनविरोध केल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाने केडीएमसीत चार आणि जळगावमध्ये एक जागा बिनविरोध करत पाच जागांवर यश मिळवले आहे. तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अहिल्यानगरमध्ये एक जागा बिनविरोध जिंकली आहे.
एकूणच राज्यात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीच्या 13 जागा बिनविरोध झाल्याने महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. मतदान होण्यापूर्वीच मिळालेल्या या यशामुळे महायुतीचा आत्मविश्वास दुणावला असून, आगामी टप्प्यांमध्येही ही आघाडी निर्णायक ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.



