Home टेक्नोलॉजी नासाच्या भारतीय शास्त्रज्ञ अनिमा पाटील यांची किनगाव इंग्लिश मीडियम स्कूलला सदिच्छा भेट 

नासाच्या भारतीय शास्त्रज्ञ अनिमा पाटील यांची किनगाव इंग्लिश मीडियम स्कूलला सदिच्छा भेट 


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमेरिकेच्या नासा या जगप्रसिद्ध अवकाश संशोधन संस्थेत कार्यरत असलेल्या भारतीय शास्त्रज्ञ सौ. अनिमा पाटील (साबळे) यांनी किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलला सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. या भेटीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अवकाश संशोधनाची ओळख होऊन त्यांच्या करिअरविषयक स्वप्नांना नवी दिशा मिळाली आहे.

या प्रसंगी शाळेच्या उपाध्यक्षा सौ. शैलेजाताई विजयकुमार पाटील यांनी सौ. अनिमा पाटील यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन औपचारिक सत्कार केला. त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अनिमा पाटील यांनी नासा या संस्थेची कार्यपद्धती, अवकाशात होणारे संशोधन, विविध अंतराळ मोहिमा तसेच आजपर्यंत आपण सहभागी झालेल्या मोहिमांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सोप्या शब्दांत समजावून सांगितली.

अवकाश संशोधन क्षेत्रात काम करताना कोणत्या प्रकारचे शास्त्रीय कौशल्य, सातत्यपूर्ण परिश्रम आणि चिकाटी आवश्यक असते, यावर त्यांनी आपल्या मनोगतातून विशेष भर दिला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अवकाश, उपग्रह, रॉकेट तंत्रज्ञान आणि भविष्यातील अंतराळ मोहिमांबाबतच्या प्रश्नांना त्यांनी समर्पक आणि उत्साहवर्धक उत्तरे दिली.

विद्यार्थ्यांनी अत्यंत चिकित्सक आणि अभ्यासपूर्ण प्रश्न विचारल्याने प्रभावित झालेल्या अनिमा पाटील यांनी त्यांचे कौतुक करत नासाचे स्टिकर्स भेट देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. या संवादातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.

सौ. अनिमा साबळे (पाटील) या शाळेच्या उपाध्यक्षा सौ. शैलेजाताई विजयकुमार पाटील यांच्या बहिणीच्या कन्या असून, स्व. केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष मनिष विजयकुमार पाटील यांच्या त्या मावस बहीण आहेत. त्यांच्या या भेटीमुळे शाळा आणि परिसरात विशेष अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.

या कार्यक्रमाला इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार देवचंद पाटील, सचिव मनिष विजयकुमार पाटील, मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील, उपमुख्याध्यापक सुहास भालेराव यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूणच, नासाच्या शास्त्रज्ञाने थेट विद्यार्थ्यांशी साधलेला हा संवाद त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरला असून, अवकाश संशोधन क्षेत्राबाबत जागृती निर्माण करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला आहे.


Protected Content

Play sound