Home Cities पारोळा १ जानेवारीपासून पर्यावरणपूरक पद्धतीने गवरीवर मोफत अंत्यविधी – नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील

१ जानेवारीपासून पर्यावरणपूरक पद्धतीने गवरीवर मोफत अंत्यविधी – नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील

0
114

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील पारोळा नगरपालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जनहिताचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. शहरातील सर्व नागरिकांसाठी १ जानेवारीपासून पर्यावरणपूरक पद्धतीने गवरीवर मोफत अंत्यविधी करण्यात येणार असून, हा उपक्रम थेट नगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींचे निकाल २१ तारखेला जाहीर झाले. त्यानंतर पारोळा शहरात शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील हे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. यापूर्वीही त्यांनी नगराध्यक्षपद भूषवले असून, त्या काळात घेतलेले जनहिताचे निर्णय आजही चर्चेत आहेत. पहिल्याच बैठकीत त्यांनी नगरपालिकेच्या हद्दीतील गोरगरीब नागरिकांसाठी लाकडावर अंत्यविधी मोफत करण्याचा तसेच नवजात बालकांना किट वाटपाचा निर्णय घेतला होता.

त्या निर्णयामुळे पारोळा शहरासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात त्यांचे कौतुक झाले होते. अनेक गरजू कुटुंबांना या योजनेचा थेट लाभ मिळाला होता. याच पार्श्वभूमीवर यावेळीही त्यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली होती. पारोळा शहरातील नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास टाकत तब्बल ९४८६ मतांनी त्यांना भरघोस विजय मिळवून दिला.

पदग्रहणाच्या वेळीच चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक जनहिताचा आणि पर्यावरणपूरक निर्णय जाहीर केला. पारंपरिक लाकडाऐवजी गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गवरीवर, तूप व कापूर वापरून अंत्यविधी करण्याची मोफत व्यवस्था नगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पर्यावरण संवर्धनास चालना मिळणार असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

नगराध्यक्षांच्या या निर्णयाचे माजी आमदार चिमणराव पाटील, आमदार अमोल पाटील यांच्यासह शहरातील ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी तसेच नगरसेवक व नगरसेविकांकडून स्वागत करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणाचा विचार करणारा हा निर्णय इतर नगरपालिकांसाठीही प्रेरणादायी ठरेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

एकूणच, पारोळा नगरपालिकेचा हा उपक्रम सामाजिक संवेदनशीलता आणि पर्यावरण रक्षणाचा आदर्श घालून देणारा ठरणार असून, शहरातील नागरिकांना मोफत व सन्मानजनक अंत्यविधीची सुविधा उपलब्ध करून देणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.


Protected Content

Play sound