रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा संगीता भास्कर महाजन यांच्या पदग्रहणाचा सोहळा शहरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शहरभर जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात हा सोहळा साजरा करण्यात आल्याने रावेरमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

सायंकाळी चार वाजता पाराचा गणपती मंदिरात पूजा-अर्चा व आरती करून कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर सजवलेल्या रथातून नवनिर्वाचित नगराध्यक्षा संगीता महाजन व नगरसेवकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या निनादात आणि फुलांच्या पुष्पवृष्टीत ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत नगरपालिकेच्या कार्यालयाजवळ आली.

नगरपालिकेच्या परिसरात पुरोहितांच्या मंत्रोच्चारात सुवासिनींनी संगीता महाजन व नवनिर्वाचित नगरसेवकांचे औक्षण केले. त्यानंतर मुख्याधिकारी सतीश पुदाके यांच्या हस्ते संगीता महाजन यांनी अधिकृतपणे नगराध्यक्षा पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला.
या पदग्रहण सोहळ्यास आमदार अमोल जावळे, माजी आमदार अरुण पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश धनके, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक दारा मोहम्मद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी पुष्पगुच्छ देत नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे स्वागत व अभिनंदन केले.
यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक राजेंद्र चौधरी, प्रमिला पाटील, नितीन महाजन, राजेश शिंदे, अर्चना पाटील, गणेश पाटील, जयश्री महाजन, अरुण अस्वार, सपना महाजन, योगिता महाजन, सादिक शेख, सीमा जमादार आदी नगरसेवक उपस्थित होते. तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत देशमुख, रवींद्र पाटील, सफदर खान, राजन लासूरकर, राहुल पाटील, वाय. व्ही. पाटील, अरुण शिंदे, नितीन पाटील, सुनील पाटील, महेमूद शेख यांच्यासह भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या सोहळ्यामुळे रावेर शहरात राजकीय व सामाजिक स्तरावर नवचैतन्य निर्माण झाले असून, नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांकडून शहर विकासासाठी सकारात्मक आणि गतिमान कार्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एकूणच रावेर नगरपालिकेच्या नव्या नेतृत्वाच्या पदग्रहणाने शहरात उत्साहाचे वातावरण पसरले असून, आगामी काळात विकासकामांना चालना मिळेल, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.



