Home Cities जळगाव जागावाटप न ठरल्यास ३७ जागांवर स्वबळावर लढणार !: काँग्रेस

जागावाटप न ठरल्यास ३७ जागांवर स्वबळावर लढणार !: काँग्रेस


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात आता काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “जळगावात महाविकास आघाडी व्हावी यासाठी आमचे सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सन्मानजनक जागावाटप न झाल्यास आम्ही ३७ जागांवर स्वबळावर निवडणूक लढविण्यास पूर्णपणे तयार आहोत,” अशी माहिती काँग्रेस नेत्यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

प्रदेश उपाध्यक्षांच्या उपस्थितीत अर्ज दाखल
सोमवारी २९ डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मुफ्ती हारून नदवी यांची विशेष उपस्थिती होती. नदवी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी पालिका आवारात गर्दी केली होती. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले.

३७ जागांचा ‘प्लॅन’ तयार
महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने ३७ जागांचा दावा करून मित्रपक्षांसमोर आव्हान उभे केले आहे. “आम्ही ३७ जागांसाठी सक्षम उमेदवारांची चाचपणी केली आहे. जर आघाडी झाली नाही, तर आम्ही कोणाचीही वाट न पाहता स्वतंत्रपणे रिंगणात उतरू,” असे काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितले.

आघाडीच्या निर्णयाकडे लक्ष
जळगाव महापालिकेत भाजप-शिंदे गट महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रित लढणार की काँग्रेस स्वतंत्र वाट निवडणार, याचे चित्र येत्या २४ तासांत स्पष्ट होईल. मुफ्ती हारून नदवी यांच्या उपस्थितीमुळे अल्पसंख्याक बहुल प्रभागांमध्ये काँग्रेसची ताकद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता काँग्रेसच्या या ‘स्वबळाच्या’ इशाऱ्याला महाविकास आघाडीचे इतर घटक पक्ष कसा प्रतिसाद देतात, यावर जळगावचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.


Protected Content

Play sound