Home Cities जळगाव गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वीर बाल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वीर बाल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद


 जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वीर बाल दिवस उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये धैर्य, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.

हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज विभागातर्फे आयोजित करण्यात आला होता. विभागप्रमुख डॉ. नितीन भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्ध नियोजन, विद्यार्थी सहभाग आणि विषयांची प्रभावी मांडणी पाहायला मिळाली.

वीर बाल दिवसाच्या औचित्याने गटचर्चा, वादविवाद आणि वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांची स्पष्ट मांडणी करत सामाजिक प्रश्नांवर परिपक्व भूमिका मांडली. प्रथम वर्षातील प्राध्यापकांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट समन्वयन केले तसेच स्पर्धांच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.

वक्तृत्व स्पर्धेत कु. राजश्री यादव या विद्यार्थिनीने प्रभावी सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. गटचर्चा स्पर्धेत प्रथम वर्ष विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सर्व मुद्दे सुस्पष्टपणे मांडून योग्य निष्कर्ष सादर करत प्रथम क्रमांक मिळवला. या गटातील कु. श्रावणी चोपडे यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

वादविवाद स्पर्धेत प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. या स्पर्धेत अश्विनी लोहार या विद्यार्थिनीने आत्मविश्वासपूर्ण आणि तर्कशुद्ध मांडणी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी मोहित चौधरी यांनी प्रभावीपणे केले.

स्पर्धांचे परीक्षण प्रा. सागर पाटील, प्रा. प्रवीण सोनवणे, प्रा. सम्यकरत्न कांबळे आणि प्रा. पूजा वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी समाधान व्यक्त करत विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

एकूणच वीर बाल दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, माहितीपूर्ण आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारा ठरला.


Protected Content

Play sound