जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत दिवसेंदिवस चुरस वाढताना दिसत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना अधिक गती मिळाली आहे. आज शुक्रवारी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला असून विविध राजकीय पक्ष तसेच अपक्ष इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणावर अर्जांची खरेदी करण्यात आली आहे.

महापालिका निवडणूक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)चे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी आज दिनांक २६ डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक १२ ‘अ’ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यासोबतच आज एकूण ४२४ इच्छुक उमेदवारांनी अर्जांची खरेदी केल्याने निवडणूक वातावरण तापले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रभागनिहाय अर्ज विक्रीचा आढावा घेतल्यास प्रभाग क्रमांक १ मधून १३, प्रभाग २ मधून १९, प्रभाग ३ मधून ४१, प्रभाग ४ मधून २०, प्रभाग ५ मधून २२, प्रभाग ६ मधून २२, प्रभाग ७ मधून १५, प्रभाग ८ मधून ३७, प्रभाग ९ मधून २०, प्रभाग १० मधून ३६, प्रभाग ११ मधून ११, प्रभाग १२ मधून २९, प्रभाग १३ मधून १५, प्रभाग १४ मधून २८, प्रभाग १५ मधून २३, प्रभाग १६ मधून २७, प्रभाग १७ मधून २४, प्रभाग १८ मधून ९ आणि प्रभाग १९ मधून १३ अर्जांची विक्री झाली आहे. या सर्व प्रभागांमधून मिळून आजच्या दिवसात एकूण ४२४ उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली.
यापूर्वीच्या दोन दिवसांत झालेल्या अर्ज विक्रीसह एकूण अर्ज खरेदीचा आकडा लक्षणीय वाढला असून येत्या काही दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्षांनी आपापल्या रणनीती आखण्यास सुरुवात केली असून इच्छुक उमेदवारांकडून प्रभागांमध्ये हालचाली वाढताना दिसत आहेत.



