जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील राजकीय घडामोडींना वेग येत असताना भारतीय जनता पार्टीत सामाजिक क्षेत्रातील सक्रिय व्यक्तिमत्त्वांचा प्रवेश सुरूच आहे. त्याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते व सेवानिवृत्त अधिकारी भास्करराव पाटील तसेच शिंपी समाजाचे प्रदेश युवा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रमोद शांताराम शिंपी यांनी बुधवारी (दि. २५ डिसेंबर) भाजपमध्ये जाहीर प्रवेश करून पक्षाला बळकटी दिली आहे.
जी. एम. फाउंडेशन येथे आयोजित कार्यक्रमात जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आमदार भोळे यांनी दोघांचेही भाजपचे गमछे देऊन स्वागत करत पक्षात अधिकृत प्रवेश दिला. यावेळी भाजपच्या विचारधारेशी निष्ठा राखून समाजहितासाठी कार्य करण्याचा निर्धार नवप्रवेशितांनी व्यक्त केला.

भास्करराव पाटील हे दीर्घकाळ सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असून, विविध उपक्रमांमधून त्यांनी समाजाशी थेट नाळ जपली आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ पक्षसंघटन व जनहिताच्या कामांना होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच तरुणाईमध्ये प्रभाव असलेले प्रमोद शिंपी हे शिंपी समाजात संघटनात्मक कार्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या प्रवेशामुळे युवकांमध्ये भाजपचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास पक्षनेत्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी उदय जी. भालेराव, भगतभाई बालाणी, जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, मुकुंद मेटकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नवप्रवेशितांचे अभिनंदन करून आगामी काळात संघटनात्मक कामात सक्रिय सहभाग अपेक्षित असल्याचे सांगितले.



