जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वावडदे जवळील बिलवाडी ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये उपसरपंच पदी कविता कोमलसिंग पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कोणत्याही विरोधाशिवाय पार पडलेल्या या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण पसरले असून, सर्वच स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
बिलवाडी ग्रामपंचायतीच्या राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करण्याऐवजी गावच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येत ही निवड बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. सरपंच विनोद श्रावण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कविता पाटील यांचे नाव उपसरपंच पदासाठी सुचवण्यात आले, ज्याला सर्व सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात मंजुरी दिली. ही बिनविरोध निवड बिलवाडी गावातील राजकीय प्रगल्भतेचे दर्शन घडवणारी ठरली आहे.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चंद्रशेखर प्रकाश वराडे यांनी कामकाज पाहिले. त्यांना ग्रामपंचायत प्रशासनाने मोलाचे सहकार्य केले. या महत्त्वपूर्ण प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य पल्लवी समाधान पाटील, धोंडू जगताप, अनिल गुलाब पाटील, रवींद्र हिलाल गोपिळ, सुपडू गुलसिंग गायकवाड, अमोल उमरे आणि लताबाई महादू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.



