Home Cities यावल केंद्रीय ओबीसी यादीत बडगुजर समाजाचा समावेश करावा : शिष्टमंडळाने घेतली दिग्गज नेत्यांची...

केंद्रीय ओबीसी यादीत बडगुजर समाजाचा समावेश करावा : शिष्टमंडळाने घेतली दिग्गज नेत्यांची भेट

0
103

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बडगुजर समाजाला केंद्रीय ओबीसी यादीत समाविष्ट करून आरक्षणाचे लाभ मिळवून देण्यासाठी लोहारी येथील ‘चामुंडा माता मिशन’च्या शिष्टमंडळाने देशाची राजधानी दिल्लीत जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. १७ ते १९ डिसेंबर दरम्यान या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी आणि मागासवर्ग आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची भेट घेऊन समाजाची कैफियत मांडली.

शिक्षणाचे आणि नोकरीचे नुकसान थांबवण्याची मागणी
बडगुजर समाजाला सद्यस्थितीत केंद्रीय ओबीसी सवलती लागू नसल्याने समाजातील तरुण पिढीला उच्च शिक्षण आणि केंद्र सरकारच्या नोकऱ्यांपासून वंचित राहावे लागत आहे. या शैक्षणिक अन्यायाची माहिती शिष्टमंडळाने खासदारांच्या निदर्शनास आणून दिली. समाजाचा अंतिम अहवाल तातडीने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (कॅबिनेट) पटलावर मांडून राष्ट्रपतींच्या राजपत्रात (गॅझेट) त्याची नोंद व्हावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

दिग्गज नेत्यांशी सकारात्मक चर्चा
या शिष्टमंडळात निवृत्त प्राचार्य पी.आर. बडगुजर, एस.एम. बडगुजर, संस्थापक अध्यक्ष नरेंद्र बडगुजर, अनंत बडगुजर आणि हिरामण बडगुजर यांचा समावेश होता. त्यांनी दिल्लीत सुप्रिया सुळे, शाहू महाराज छत्रपती, स्मिता वाघ, रक्षाताई खडसे आणि रामदास आठवले यांच्यासह विविध पक्षांच्या खासदारांची भेट घेतली. विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत डॉ. एन.डी. राऊत आणि श्रावण फरकांडे यांची झालेली चर्चा सकारात्मक ठरल्याने समाजाच्या आशा उंचावल्या आहेत.

आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत
महाराष्ट्र ओबीसी कृती समितीच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून हा पाठपुरावा सुरू आहे. शिष्टमंडळाने यापूर्वीही दोन-तीन वेळा दिल्ली दौरे करून केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आता हा प्रस्ताव प्रगतीपथावर असून लवकरच बडगुजर समाजाचा केंद्रीय ओबीसीमध्ये समावेश होण्याचे संकेत मिळत आहेत.


Protected Content

Play sound