Home आरोग्य डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ६० वर्षीय महिलेची यशस्वी हृदय शस्त्रक्रिया

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ६० वर्षीय महिलेची यशस्वी हृदय शस्त्रक्रिया


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील ६० वर्षीय महिलेवर हृदयाला जाणारा रक्तपुरवठा पूर्णपणे खंडित झालेल्या अत्यंत गंभीर अवस्थेत डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात वेळेवर आणि यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. ‘गोल्डन अवर्स’मध्ये मिळालेल्या तातडीच्या उपचारांमुळे रुग्णाचे प्राण वाचले असून, ही शस्त्रक्रिया हृदयरोग उपचार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.

भुसावळ येथील सुरेखा मोरे (वय ६०) यांना अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या होत्या. त्यासोबतच सतत उलट्या होत असल्याने प्रकृती झपाट्याने खालावत होती. वेदना वाढत चालल्याने नातेवाइकांनी तातडीने त्यांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले. दाखल होताच हृदयालयाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या पथकाने ईसीजीसह आवश्यक तपासण्या त्वरित सुरू केल्या. ईसीजी व रक्ततपासण्यांतून रुग्णाला तीव्र हृदयविकाराचा झटका (मेजर हार्ट अटॅक) आल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासणीसाठी करण्यात आलेल्या अँजिओग्राफीमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणारी प्रमुख वाहिनी तब्बल १०० टक्के ब्लॉक झाल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार अत्यंत जीवघेणा असून काही मिनिटांचाही विलंब प्राणघातक ठरू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणताही विलंब न करता तातडीने अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. डीएम कार्डिओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सिध्देश्वर खांडे व डॉ. आकाश पवार यांनी रुग्णावर यशस्वी अँजिओप्लास्टी केली. ब्लॉक झालेल्या रक्तवाहिनीत स्टेंट बसवून हृदयाला पुन्हा सुरळीत रक्तपुरवठा सुरू करण्यात आला.

शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. छातीतल्या वेदना कमी झाल्या, श्वसन सुरळीत झाले आणि रुग्णाला दिलासा मिळाला. शस्त्रक्रियेदरम्यान सुधाकर बिराजदार यांच्यासह नर्सिंग स्टाफने मोलाचे सहकार्य केले. शस्त्रक्रियेनंतरची काळजी डॉ. मनमिता रेड्डी, डॉ. रिषभ पाटील आणि डॉ. झिशान यांनी घेतली.

छातीत दुखणे, उलट्या, घाम येणे, धाप लागणे ही हृदयविकाराची महत्त्वाची लक्षणे असून त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने तज्ज्ञांकडे जाणे गरजेचे आहे. वेळेत रुग्णालयात दाखल केल्याने त्वरित उपचार शक्य झाले आणि प्राण वाचवता आले, असे निवासी डॉक्टर डॉ. सिध्देश्वर खांडे यांनी सांगितले. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, अत्याधुनिक कॅथलॅब आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथकामुळे आज अशा गंभीर हृदयविकारांवरही यशस्वी उपचार शक्य होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound