मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडत अखेर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा झाली. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली ही युती बुधवारी जाहीर झाल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

या पत्रकार परिषदेला प्रचंड राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. याआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते. या दर्शनानंतरच ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची औपचारिक घोषणा केली.

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दांत सांगितले की, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली आहे. महाराष्ट्राच्या हितापेक्षा कोणताही वाद किंवा भांडण मोठे नाही, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. माझ्या एका मुलाखतीतील वाक्यापासूनच या युतीची सुरुवात झाली, असे सांगत त्यांनी पुढील रणनीतीबाबत सध्या तपशील देण्यास नकार दिला. कोण किती जागा लढवणार, उमेदवार कधी अर्ज भरणार याची माहिती योग्य वेळी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राजकीय टोळ्यांवर सूचक टीका करत उपस्थित पत्रकारांनाही महाराष्ट्र आणि मुंबईवर प्रेम असणाऱ्यांनी आमच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन केले. मुंबईचा महापौर हा मराठीच आणि तो आमचाच होणार, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांनीही यावेळी आक्रमक भूमिका मांडली. भाजपला मुंबईचे लचके तोडायचे असून महाराष्ट्राची वाट लावण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. आपण भांडत राहिलो तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांचा अपमान होईल, त्यामुळे कर्तव्य म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही केवळ एकत्र आलो नाही तर एकत्र राहण्यासाठी आलो आहोत, हे त्यांनी ठामपणे सांगितले. मुंबई आणि महाराष्ट्राकडे जो कोणी वाकड्या नजरेने पाहील, त्याचा राजकीय खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने ‘कटेंगे तो बटेंगे’ असा अपप्रचार केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाला थेट आवाहन केले. आता चुकाल तर संपल, त्यामुळे मराठीचा वसा टाकू नका, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. या युतीमुळे मुंबईसह सात महानगरपालिकांच्या निवडणुकांत ठाकरे ब्रँड एकत्र येणार असल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ही युती मोठे राजकीय आव्हान उभे करणार आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीमुळे मराठी मतदारांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता असून, मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे संकेत या घोषणेतून मिळत आहेत.



