जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अत्यंत गजबजलेल्या सेंट्रल फुले मार्केटमध्ये लघुशंका केल्याच्या संशयावरून दोन गटांत जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले असून, एका दुकानदाराच्या डोक्यात इलेक्ट्रीक शेगडीची कॉपर कॉईल मारून त्याला गंभीर जखमी करण्यात आले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंधी कॉलनीतील रहिवासी अमर चेतनदास कारडा (वय ३७) यांचे फुले मार्केटमध्ये दुकान आहे. २२ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास हा वाद उद्भवला. अमर कारडा यांच्या दुकानातील कामगार शेजारील घनशाम पोपली यांच्या दुकानाजवळ लघुशंका करत असल्याचा संशय पोपली यांना होता. याच कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली.

सुरुवातीला केवळ शिवीगाळ आणि धक्काबुक्कीपर्यंत असलेला हा वाद काही वेळातच विकोपाला गेला. रागाच्या भरात घनशाम पोपली आणि शेखर पोपली यांनी अमर कारडा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी शेखर पोपली याने दुकानात असलेली इलेक्ट्रीक शेगडीची जड कॉपर कॉईल उचलून थेट कारडा यांच्या डोक्यात मारली. या हल्ल्यात कारडा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते रक्तबंबाळ झाले.
अमर कारडा यांनी तातडीने रुग्णालयात उपचार घेतले आणि त्यानंतर शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. कारडा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित घनशाम पोपली आणि शेखर पोपली यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे मार्केट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस हेड कॉन्स्टेबल इंदल जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, संशयितांचा शोध सुरू आहे.



