जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वर्दळीच्या खोटे नगर परिसरातून हॉटेल गावकरीच्या समोर बांधलेली हॉटेल मालकाची गाय चोरट्यांनी कारमध्ये कोंबून चोरून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी २१ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता समोर आली आहे. गाय चोरून नेतांना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
ही घटना रविवार, २१ डिसेंबर२०२५ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली. खोटे नगर भागात असलेल्या ‘गावकरी हॉटेल’च्या समोर हॉटेल मालकाची गाय बांधलेली होती. रात्रीच्या सामसुमतेचा फायदा घेत दोन अज्ञात इसम पांढऱ्या रंगाच्या ब्रेजा कारमधून त्या ठिकाणी आले. त्यांनी अत्यंत सराईतपणे गाईला ओढत गाडीच्या मागील डिक्कीत कोंबले. काही सेकंदातच हा सर्व प्रकार आटोपून चोरट्यांनी गाडीसह तिथून पलायन केले. ही संपूर्ण थरारक चोरी हॉटेलच्या परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या प्रकरणी हॉटेल मालकाने तातडीने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन चोरटे आणि चोरीसाठी वापरलेली कार स्पष्टपणे दिसत असूनही, २४ तास उलटल्यानंतरही पोलिसांच्या हाती कोणताही धागादोरा लागलेला नाही. तक्रार नोंदवूनही तपासाची चक्रे संथ गतीने फिरत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
शहरात रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी वारंवार केली जात असताना, अशा प्रकारच्या धाडसी चोऱ्यांमुळे पशुपालक धास्तावले आहेत. जळगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने छडा लावून त्या दोन्ही चोरट्यांना बेड्या ठोकाव्यात आणि चोरीला गेलेली गाय परत मिळवून द्यावी, अशी मागणी हॉटेल मालक व स्थानिक रहिवाशांनी केली आहे.



