मुक्ताईनगरमध्ये स्मार्ट ई-कंटेंट प्रशिक्षणाचा यशस्वी उपक्रम


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डिजिटल शिक्षणाच्या वाढत्या गरजांनुसार शिक्षकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे “DGShiksha: Empowering Educators through Smart E-Content” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासन पुरस्कृत महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर (MSFDA), पुणे आणि PM-USHA यांच्या सहकार्याने झालेल्या या कार्यशाळेला शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यशाळेच्या प्रारंभी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य प्रो. डॉ. हेमंत महाजन यांनी आजच्या डिजिटल युगात ई-कंटेंटचे महत्त्व अधोरेखित केले. पारंपरिक अध्यापनासोबतच आधुनिक ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर केल्यास शिक्षण अधिक परिणामकारक होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. शिक्षकांनी तंत्रज्ञानाशी मैत्री करून विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापन पद्धतीत बदल करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रमुख वक्ते डॉ. श्री गणेश लोखंडे, महा ज्ञानदीप ऑनलाइन प्रशिक्षक व्यवस्थापक, यांनी ई-कंटेंट निर्मितीच्या संपूर्ण प्रक्रियेवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी Canva, Google Classroom, MOOC, Moodle, Powtoon आणि H5P यांसारख्या विविध डिजिटल टूल्स व प्लॅटफॉर्म्सचा वापर कसा करावा, याचे सविस्तर प्रात्यक्षिकासह स्पष्टीकरण दिले. योग्य नियोजन, स्पष्ट उद्दिष्टे आणि आकर्षक सादरीकरण यामुळे ई-कंटेंट अधिक प्रभावी ठरते, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास श्री. कबीर पळशीकर, व्यवस्थापक नेटवर्किंग, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे, डॉ. संजीव साळवे, उपप्राचार्य, तसेच प्रा. डॉ. अनिल पाटील, समन्व्यक PM-USHA यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. वंदना चौधरी, उपप्राचार्य यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनाची जबाबदारी डॉ. अतुल वाकोडे, सह-समन्व्यक PM-USHA यांनी सांभाळली.

कार्यक्रम दोन सत्रांत पार पडला. पहिल्या सत्रात ई-कंटेंट तयार करण्याच्या मूलभूत संकल्पना आणि विविध डिजिटल साधनांची ओळख करून देण्यात आली. उद्दिष्ट निश्चित करणे, स्क्रिप्ट लेखन आणि योग्य टूल्सची निवड या टप्प्यांवर भर देण्यात आला. Canva आणि Powtoon द्वारे आकर्षक स्लाईड्स व व्हिडिओ, Google Workspace मधील Slides, Forms आणि Sites, तसेच Articulate Storyline, Adobe Captivate यांसारखी प्रगत साधने आणि H5P, Genially यांसारखी ओपन सोर्स टूल्स यांची माहिती देण्यात आली. उपस्थित शिक्षकांनी डिजिटल कंटेंटमुळे विद्यार्थ्यांचा सहभाग कसा वाढतो, यावर आपले अनुभव मांडले.

दुसऱ्या सत्रात प्रत्यक्ष हँड्स-ऑन प्रशिक्षण देण्यात आले. सहभागींना लॅपटॉप आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. डॉ. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली Canva वर स्लाईड तयार करणे, Google Forms द्वारे क्विझ बनवणे आणि H5P मध्ये इंटरॅक्टिव्ह मॉड्यूल विकसित करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले. या सत्रात ५० हून अधिक शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला आणि त्यांनी तयार केलेले ई-कंटेंट तत्काळ शेअर केले, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्राचार्य प्रो. डॉ. हेमंत महाजन यांनी सर्व वक्ते, आयोजक आणि सहभागी शिक्षकांचे कौतुक केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने शिक्षकांना डिजिटल शिक्षणासाठी सज्ज करण्यासाठी अशा कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. MSFDA आणि PM-USHA यांच्या सहकार्याने भविष्यातही असे उपक्रम नियमितपणे राबविण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले. प्रमाणपत्र वितरणानंतर कार्यशाळेचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला.

थोडक्यात सांगायचे तर, DGShiksha कार्यशाळेमुळे शिक्षकांना आधुनिक डिजिटल साधनांची ओळख मिळाली असून, स्मार्ट ई-कंटेंटच्या माध्यमातून शिक्षण अधिक प्रभावी करण्याचा मार्ग खुला झाला आहे.