आ. चंद्रकांत पाटीलच मुक्ताईनगरचे ‘धुरंधर’ : खडसे कुटुंबाला पुन्हा धक्का !


मुक्ताईनगर-स्पेशल रिपोर्ट । आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज भाजपच्या उमेदवारांना धुळ चारत येथील नगरपंचायतीवर सत्ता संपादन केल्याची बाब अनेक अर्थांनी लक्षणीय अशीच आहे. या माध्यमातून मुक्ताईनगरचे खरे ‘धुरंधर’ हे आ. पाटील हेच असल्याचे नव्याने अधोरेखीत झाले आहे. तर केंद्रीय मंत्री रक्षाताई व खडसे कुटुंबाला यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

एकीकडे सावदा नगरपालिकेत शिवसेना आणि भाजपची युती होत असतांना दुसरीकडे याच मतदारसंघातील मुक्ताईनगर नगरपंचायतीत युती फिसकटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे आणि आ. चंद्रकांत पाटील यांनी यासाठी एकमेकांना जबाबदार धरले तेव्हापासूनच ही लढत ‘हाय व्होल्टेज’ होणार असल्याचे संकेत मिळाले होते, आणि झालेदेखील तसेच !

खरी मजा तर आ. चंद्रकांत पाटील यांनी आपली कन्या संजना पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आली. तेव्हापासून रक्षाताई खडसे यांनी निवडणुकीत जास्त रस घेतला. आणि या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. एकाने आरोप केला ती दुसऱ्याने तो खोडून काढत प्रत्यारोप करायचे असा प्रकार यातून सुरू झाला.

खरी मजा तर आ. चंद्रकांत पाटील यांनी आपली कन्या संजना पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आली. तेव्हापासून रक्षाताई खडसे यांनी निवडणुकीत जास्त रस घेतला. आणि या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. एकाने आरोप केला ती दुसऱ्याने तो खोडून काढत प्रत्यारोप करायचे असा प्रकार यातून सुरू झाला.

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आ. एकनाथ खडसे यांनी देखील निवडणुकीत उडी मारली. यामुळे रक्षाताई खडसे आणि त्यांचे सासरे नाथाभाऊ हे एकीकडे तर आ. चंद्रकांत पाटील हे दुसरीकडे असा जंगी सामना सुरू झाला. निवडणुकीच्या आदल्या दिवसापासून तर दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफुस सुरू झाली. मतदानाच्या दिवशी दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. हा वाद पोलीस स्थानकात गेला. यामुळे वातावरण मोठ्या प्रमाणात तणावाचे बनले. अर्थात, यामुळे निवडणुकीची चुरस अजून मोठ्या प्रमाणात वाढली.

यामुळे साहजीकच मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक ही राज्यभरात गाजली. विशेष करून केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे या एका नगरपंचायतीसाठी ठाण मांडून बसल्या. त्यांनी स्वत: देखील आपण या निवडणुकीची सूत्रे हाती घेतली असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. यामुळे सर्व ठिकाणी येथील निवडणुकीची चर्चा सुरू झाली. आणि या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत संजना चंद्रकांत पाटील यांनी बाजी तर मारलीच पण शिवसेनेला नगरपंचायतीत स्पष्ट बहुमत देखील मिळाले. हा शिवसेनेसाठी आनंदाचा डबल बार ठरला. आणि अर्थातच, याचे शिल्पकार म्हणून आ. चंद्रकांत पाटील यांच्या लौकीकात देखील भर पडली आहे.

अनेक अडथळ्यांवर मात करून त्यांनी हा अतिशय कठीण वाटणारा विजय खूप सहजसोपा करून संपादन केल्याची बाब ही लक्षणीय अशीच आहे. विशेष बाब म्हणजे हे करत असतांना त्यांनी सावदा या नगरपालिकेत भाजपशी महायुती केली. तर बोदवड येथील नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोध करून स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले. अर्थात, त्यांनी मोठा राजकीय मुरब्बीपणा देखील दाखविला आहे.

या माध्यमातून आ. चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघातील आपल्या वर्चस्वाला अजून मजबूत केले आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला ते अजून मोठ्या आत्मविश्वासाने समोर जाणार आहेत. आणि नंतरच्या सर्व निवडणुकांसाठी त्यांना आणि पर्यायाने शिवसेनेला नवीन प्राणवायू देणारा हा विजय ठरला आहे. आणि म्हणूनच या विजयाचे शिल्पकार असणारे चंदूभाऊ हे मुक्ताईनरचे खरे ‘धुरंधर’ असल्याचे नव्याने सिध्द झाले आहे.