भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपालिका निवडणुकीचा निकाल रविवारी सकाळी जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले असून, अत्यंत चुरशीच्या व लक्षवेधी ठरलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार गायत्री चेतन भंगाळे यांनी नगराध्यक्ष पदावर दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपाच्या उमेदवार रजनी संजय सावकारे यांचा त्यांनी अवघ्या १ हजार ८४७ मतांनी पराभव करत भुसावळच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण केले आहे.
नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या थेट लढतीत गायत्री भंगाळे यांना ४२ हजार २३४ मते मिळाली, तर भाजपाच्या रजनी सावकारे यांना ४० हजार ३८७ मते मिळाली. मतमोजणीदरम्यान प्रत्येक फेरीत चढ-उतार दिसून येत होते. अखेर शेवटच्या फेरीनंतर गायत्री भंगाळे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला.
नगराध्यक्ष पदाच्या लढतीत इतर उमेदवारांनाही लक्षणीय मते मिळाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अर्शिया अन्सारी यांना ८ हजार २५१, काँग्रेसच्या सविता प्रवीण सुरवाडे यांना ४ हजार ०७१ तर बसपाच्या किर्ती सुरेश वानखेडे यांना १ हजार ०९६ मते मिळाली. विशेष म्हणजे १ हजार १४६ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडत असंतोष व्यक्त केला.
नगरपालिका निवडणुकीत प्रभागनिहाय निकाल पाहता अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक एकमध्ये भाजपाने आपले वर्चस्व कायम राखले. प्रभाग १ ‘अ’ मधून पूजा प्रेमचंद तायडे तर १ ‘ब’ मधून गिरीश सुरेश महाजन विजयी झाले. मात्र काही प्रभागांमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट तसेच अपक्ष उमेदवारांनीही चांगली कामगिरी करत सत्तासंतुलन अधिक रंगतदार केले.
प्रभाग क्रमांक दोनमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व भाजपाने प्रत्येकी एक जागा मिळवली, तर प्रभाग क्रमांक तीनमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेसने विजय नोंदवला. प्रभाग चार, पाच आणि सहा या भागांत भाजपाचे उमेदवार विजयी झाले असले तरी काही ठिकाणी मतांचे अंतर अत्यंत कमी असल्याने या लढती चर्चेचा विषय ठरल्या.
प्रभाग सातमध्ये अपक्ष उमेदवार सुजित हेमराज पाटील यांनी भाजपाच्या दिग्गज नेत्यांचा पराभव करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रभाग आठमध्ये भाजपाने एक जागा तर शिवसेना शिंदे गटाने एक जागा जिंकली. प्रभाग नऊमधील काका-पुतण्या लढत शहरभर चर्चेचा विषय ठरली असून, या लढतीत भाजपाचे युवराज लोणारी यांनी पुतण्या जयंत लोणारी यांचा पराभव केला.
प्रभाग दहा ते पंचवीसपर्यंत विविध पक्षांचे व अपक्ष उमेदवार विजयी झाले असून, भाजपाने अनेक प्रभागांमध्ये वर्चस्व राखले, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानेही मोठ्या प्रमाणावर यश मिळवले. काँग्रेसने काही प्रभागांत महत्त्वपूर्ण विजय नोंदवला, तर अपक्ष उमेदवारांनीही सत्ताधाऱ्यांना धक्का दिला.
दरम्यान, मतमोजणीदरम्यान मिडीया कक्षातील गैरव्यवस्थेबाबत पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर दीर्घकाळ कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही. सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती नसल्याने आणि काही माध्यम प्रतिनिधींना मतमोजणी स्थळी प्रवेश नाकारण्यात आल्याने पत्रकारांनी एकत्र येत मिडीया कक्षावर बहिष्कार टाकला. गेल्या ३० वर्षांत प्रथमच अशा प्रकारची वागणूक मिळाल्याचा आरोप करत पत्रकारांनी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाकडे तीव्र तक्रार नोंदवली.
एकूणच भुसावळ नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा विजय, भाजपाचे प्रभागनिहाय वर्चस्व, विविध पक्षांचे मिश्र यश आणि माध्यमांशी संबंधित वाद या सर्व बाबींमुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे.



