चौधरी इज बॅक… वापस आ गये भुसावल के ‘शेर’ : चाहते बेभान !

0
378

भुसावळ-जितेंद्र कोतवाल/इकबाल खान । लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्या उमेदवार गायत्री भंगाळे यांना निवडून आणत माजी आमदार संतोष चौधरी आणि त्यांचे बंधू अनिल चौधरी यांची शहराच्या राजकारणामध्ये झोकात ‘रि-एंट्री’ झाली आहे. राजकारणातील हे वादळी पर्व संजय सावकारे यांच्या वाटचालीत काटे पेरणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी मंत्री संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती रजनीताई सावकारे यांचा अगदी सहज विजय होईल असे सर्वांना वाटत होते. कारण सर्वच बाबतीत त्या सरस होत्या. एक तर, संजय सावकारे हे कॅबिनेट मंत्री असल्यामुळे त्यांच्या कडे सर्व रिसोर्सेस होते. यात सत्ता आणि पैसा या महत्वाच्या घटकांसह लेवा पाटीदार समाजाचे भक्कम पाठबळ ही त्यांची जमेची बाजू होती. एवढेच नव्हे तर भुसावळातील अठरापगड समाजांमध्ये देखील त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग असल्याने रजनीताई सावकारे यांचा विजय सुलभ असल्याचे राजकीय निरिक्षकांचे मत होते.

अगदी प्रचाराच्या कालखंडातही रजनीताईंनी कधीपासूनच प्रचार सुरू केला. त्यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद देखील मिळू लागला होता. एवढेच नव्हे तर त्यांच्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळात भव्य सभा घेऊन वातावरण निर्मितीचे काम केले. यामुळे वरून दिसणारी हवा ही भाजपच्या बाजूने होती. याच्या जोडीला त्यांनी चाणक्यनितीचाही वापर केला.

अर्थात, सावकारेंना न मिळणारी आंबेडकरी समाजाची मते अनेक ठिकाणी विभाजीत करण्यासाठी त्यांनी फिल्डींग लावली. यातच काहीही सुगावा न देता राष्ट्रवादी अजित पवार गटाने थेट मुस्लीम महिलेला नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊन सौभाग्यवती सावकारेंचा मार्ग सोपा केल्याचे मानले जात होते. मात्र सर्व गदारोळात संतोष चौधरी यांनी शांतपणे एक योजना आखली. त्यांना आ. एकनाथराव खडसे यांनी भक्कम साथ दिली. तर, त्यांचे बंधू अनिल चौधरी यांनी पक्षीय अडसर दूर सारून थेट तुतारीच्या उमेदवाराचा प्रचार तर केलाच पण त्यांनी सावकारेंना अक्षरश: धारेवर धरले.

ना. संजय सावकारे यांनी एका भाषणात कोण अनिल चौधरी ? असा सवाल केल्यानंतर अनिल चौधरींनी याला अतिशय शेलक्या भाषेत उत्तर तर दिलेच पण त्यांनी भुसावळ फाईल्स ओपन करत सावकारे हे भ्रष्टाचारी असल्याचा दावा भुसावळकरांसमोर मांडला. या सर्व प्रकारात गायत्री चेतन भंगाळे यांची उमेदवारी ही गेमचेंजर ठरली. त्या मूळचा एससी प्रवर्गातील असल्या तरी त्यांनी लेवा पाटीदार समाजातील तरूणाशी विवाह केल्यामुळे त्या लेवा समाजाची सून असल्याचे नॅरेटीव्ह चौधरी बंधूनी अतिशय प्रखरतेने मांडले. याला नाथाभाऊंसारख्या लेवा समाजातील मातब्बर नेतृत्वाने पाठबळ दिले. यातूनच रजनी सावकारे यांच्या सारख्या हेवीवेट उमेदवाराला पराभूत करून गायत्री भंगाळे या खऱ्या अर्थाने जायंट किलर ठरल्या आहेत.

या विजयातून बरोबर नऊ वर्षांनी भुसावळ शहराच्या राजकारणात चौधरी बंधूंची पुन्हा एंट्री झाली आहे. डिसेंबर 2016 मध्ये झालेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत संतोष चौधरी यांचे चिरंजीव सचिन चौधरी यांचा पराभव झाला होता. त्यावेळी रमण भोळे निवडून आले होते. त्यानंतर आता डिसेंबर 2025 मध्येच चौधरींचे नगरपालिकेत पुनरागमन होत आहे.

आता याचा भुसावळ शहरावर नेमका काय परिणाम होणार ? याचे उत्तर आपल्याला भविष्यात मिळणार आहे. तथापि, आजचा निकाल हा चौधरी समर्थकांना नक्कीच सुखावणारा आहे. आणि याचीच प्रचिती सोशल मीडियातून येत असून त्यांच्या चाहत्यांनी जोरदार जल्लोष सुरू केला आहे.