वरणगाव, ता. भुसावळ-दत्तात्रय गुरव | येथील नगरपालिकेत मोठा उलटफेर झाला असून भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर बंडखोरी करत निवडणुकीत उभे राहिलेल्या सुनील काळे यांना वरणगावकरांनी कौल दिला आहे. त्यांचा विजय हा भाजपसाठी धक्का मानला जात आहे. तर आश्चर्याची बाब म्हणजे भाजपला सर्वाधीक नगरसेवकांच्या स्वरूपात बहुमत देखील मिळाले आहे.
वरणगाव नगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत अभूतपुर्व चुरस पहायला मिळाली. माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी आपल्याला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळेल असे गृहीत धरले होते. यातच आरक्षण देखील अनुकुल निघाल्याने ते जोरात कामाला लागले होते. तथापि, भारतीय जनता पक्षाने जिल्हा दुध संघाच्या संचालिका शामलताई अतुल झांबरे यांना उमेदवारी दिल्याने काळे यांना धक्का बसला. अर्थात, त्यांनी बंडाचे निशाण फडकावत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली.
दरम्यान, दुसरीकडे भाजपचे कट्टर विरोधक म्हणून स्थानिक राजकारणात मोलाची भूमिका बजावणारे राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणूक लढविली. तर, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या सौभाग्यवती यांनी देखील निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
निवडणुकीच्या प्रचारात सर्व उमेदवारांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. सुनील काळे यांनी पाणी पुरवठा योजनेसह शहरात झालेल्या विकासाचे श्रेय घेण्याचा दावा केला. तर भारतीय जनता पक्षाने ना. संजयभाऊ सावकारे यांच्या माध्यमातून ही सर्व कामे झाल्याचा दावा केला. शामलताई झांबरे यांच्यासाठी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांनी प्रचार सभा घेतल्या. उमेदवारांनी कॉर्नर सभांवर जास्त भर दिला. निवडणुकीच्या प्रचारात वरणगाव शहरातील वातावरण मोठ्या प्रमाणात ढवळून निघाले.
दरम्यान, या पार्श्वभूमिवर, आज रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी मतमोजणी सुरू झाली. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये भाजपच्या शामलताई झांबरे यांना आघाडी मिळाल्याने पक्षाच्या गोटात उत्साहाचे वारे होते. मात्र सुनील काळे यांनी जोरदार मुसंडी मारत विजय संपादन केला.
दरम्यान, नगरसेवकांचा विचार केला असता येथे भारतीय जनता पक्षाचे 14 नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे पाच तर शरद पवार गटाचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. म्हणजेच भाजपची सत्ता आली असली तरी मात्र नगराध्यक्षाचा उमेदवार पडल्याचा प्रकार वरणगावमध्ये घडला आहे.



