पाचोरा नगरपालिकेच्या उर्वरित दोन प्रभागांत ६६.७० टक्के मतदान 


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उर्वरित दोन प्रभागांसाठी पार पडलेल्या मतदानामुळे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून आता सर्वांचे लक्ष मतमोजणी आणि निकालाकडे लागले आहे. शांततेत पार पडलेल्या या मतदानाने नगरसेवक पदासाठी उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

पाचोरा नगरपालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह एकूण २८ नगरसेवक पदे आहेत. यापैकी नगराध्यक्ष पदासह २६ नगरसेवक पदांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र प्रभाग क्रमांक ११-अ आणि १२-ब या दोन जागांवरील निवडणूक न्यायालयीन प्रकरणांमुळे पुढे ढकलण्यात आली होती. न्यायालयीन अपिलांवरील आदेश २३ नोव्हेंबरनंतर झाल्याने निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार माघारीची मुदत आणि निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर करण्यात आला.

या नव्या कार्यक्रमानुसार २० डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक ११-अ आणि १२-ब साठी मतदान प्रक्रिया पार पडली. प्रभाग क्रमांक ११-अ साठी जि. प. मुलींची शाळा, जामनेर रोड येथे, तर प्रभाग क्रमांक १२-ब साठी मिठाबाई कन्या शाळा, कोंडवाडा गल्ली येथे मतदान केंद्रे ठेवण्यात आली होती. दोन्ही प्रभागांत मिळून ६६.७० टक्के मतदान झाले असून ही टक्केवारी समाधानकारक मानली जात आहे.

या दोन प्रभागांमधून एकूण पाच नगरसेवक पदांसाठी उमेदवार निवडले जाणार आहेत. प्रभाग क्रमांक ११-अ आणि १२-ब मधील एकूण ८ हजार ८४० मतदारांपैकी ३ हजार ५२ पुरुष आणि २ हजार ८४४ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली असून कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पालिका निवडणुकीतील सर्व जागांसाठी मतदान झाले असले तरी शहरात अद्याप आचारसंहिता लागू आहे. २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता शिथिल होणार असून त्यानंतर नवनिर्वाचित प्रतिनिधींना कार्यभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा होईल.

आज २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून पाचोरा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना मोरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी मंगेश देवरे आणि तहसीलदार विजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील स्व. आर. ओ. तात्या पाटील व्यापारी भवन येथे मतमोजणी केली जाणार आहे. एकूण १२ टेबलांवर मतमोजणी होणार असून त्यापैकी एका टेबलवर टपाली मतमोजणी केली जाईल, तर आठ फेऱ्यांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

मतमोजणीसाठी नगरपालिकेकडून सुमारे ६० कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दुपारी १ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता असून उमेदवारांसह समर्थकांमध्ये उत्सुकता आणि धाकधूक दोन्ही वाढली आहे.

एकूणच उर्वरित दोन प्रभागांच्या मतदानाने पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीचा अंतिम टप्पा पूर्ण झाला असून आजच्या निकालानंतर शहराच्या राजकारणाचे चित्र स्पष्ट होणार आहे.