

मुक्ताईनगर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या उद्या जाहीर होणाऱ्या निकालांच्या पार्श्वभूमीवर विजय मिरवणुकांबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीसाठी परवानगी देण्यात आलेली नसल्याची स्पष्ट भूमिका पोलिस प्रशासनाने मांडली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असून, शहरात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासंदर्भात मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अडसूळ यांनी माहिती देताना सांगितले की, नगरपंचायतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवारांना विजय मिरवणूक काढण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच आतापर्यंत कोणत्याही गटाकडून परवानगीसाठी अर्ज किंवा विनंतीही आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निकाल जाहीर होण्याच्या वेळी कोणताही वाद, गोंधळ अथवा सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होईल अशी कृती करू नये, अशा स्पष्ट सूचना सकाळीच सर्व उमेदवारांना देण्यात आल्याचेही पोलीस निरीक्षक अडसूळ यांनी नमूद केले. कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. दरम्यान, निकालानंतर उत्साहाच्या भरात अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. नागरिकांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी संयम पाळून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.



