

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ८ ब च्या राखीव जागेसाठी शनिवारी शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला असून सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सातोड रोडवरील जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक एक व माध्यमिक कन्या शाळेच्या इमारतीत उभारण्यात आलेल्या तीन मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच मतदारांची गर्दी वाढताना दिसली. मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्याने या प्रभागातील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शांतता व सुव्यवस्थेत मतदान पार पडावे यासाठी प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती.
या प्रभागात एकूण ३ हजार ४३४ मतदार नोंदणीकृत असून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ७७.६६ टक्के मतदानाची नोंद झाली. यामध्ये १ हजार ३९३ पुरुष तर २ हजार ७४ महिला मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. महिलांचा सहभाग लक्षणीय असल्याचे यावेळी दिसून आले.
निवडणुकीदरम्यान विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मतदान केंद्राबाहेर उपस्थिती लावली. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सागर कुमार चौधरी यांच्या समर्थनार्थ भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. छाया पाटील यांनी मतदारांशी संवाद साधत मतदानाचे आवाहन केले.
दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोविंद मधुकर बारी यांच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राकेश फेगडे, भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. रोहिणी उमेश फेगडे, माजी सभापती नारायण चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आर. जी. पाटील (नाना), माजी तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, यावल मंडळ अध्यक्ष सागर कोळी, सरचिटणीस भरत पाटील व ज्ञानेश्वर तायडे, तसेच शहर अध्यक्ष राहुल बारी यांनी मतदारांना मतदानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
एकूणच प्रभाग क्रमांक ८ ब मधील ही निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असून वाढलेले मतदानाचे प्रमाण राजकीय समीकरणांवर परिणाम करणारे ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



